File Photo : Chhagan Bhujbal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तीनही पक्षांचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेकांचा शपथविधी सोहळाही पार पडला. पण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर आता ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत.
हेदेखील वाचा : Bihar Politics: तर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार….? नितीश कुमारांच्या गोटात हालचालींना वेग
महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये खातेवाटपावरून एकमत होत नव्हते. मात्र, आता या खातेवाटपावर एकमत झाले असून, त्याची यादीच समोर आली आहे. यामध्ये भाजपकडे अनेक महत्त्वाची खाती असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असणार आहे. महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या तीन नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली आहे.
दरम्यान, सत्तास्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यावर दावा केला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कारण, आता झालेल्या खातेवाटपात त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे भाजपने हे खाते त्यांच्याकडे ठेवल्याचे दिसत आहे. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगर विकास तर अजित पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे.
अनेक नेत्यांचा पत्ता कट
छगन भुजबळ, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिकाही स्पष्ट केली. पण, आता ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.
समता परिषदेतील काहीजण म्हणताहेत स्वतःचा पक्ष काढा
‘लोक म्हणातायेत भाजपमध्ये जा, समता परिषदेतील काही जण म्हणत आहेत की स्वतःचा पक्ष काढा. प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करत आहेत. समता परिषद ही अखिल भारतीय आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडेही मार्ग मोकळा आहे’, असे संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधला नाही. मात्र, समीर भुजबळ यांच्याशी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितलं.
हेदेखील वाचा : खातेवाटपानंतर आता इच्छुकांचे डोळे पालकमंत्रिपदाकडे; संभाजीनगर, रायगडसाठी शिवसेना आग्रही