मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटींची सुपारी
मुंबई : आयएएस तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून हे खाते देशभरात चर्चेत आले आहे. सरकारने या विभागाला गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भेसळीने कॅन्सरच्या आजारात वाढ झाली आहे. माल तपासणीसाठी पाठवला जातो तो अद्ययावत नाही, असे आव्हाड म्हणाले. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीकडून २५० कोटी रुपये गोळा केल्याची धक्कादायक माहिती जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली.
तुकाराम मुंढे यांची मोठी सुपारी घेण्यात आली आहे. २५० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ड्रग्ज लॉबी, मेडिकल कंपन्या अशा अनेक एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. पुढच्या आठवड्यात मी नावानिशी सगळं समोर आणणार असल्याचे आव्हाड म्हणाले. अन्न व प्रशासन विभाग झिरवळ चालवत नसून ते आणखी कोणीतरी चालवत आहेत, असा आरोप देखील आव्हाडांनी केला.
बदली केली जाणार नाही
अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आवश्यक संसाधनांचा अभाव असल्याची कबुली अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली. विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, अधिकाऱ्यांना लागणारी वाहने, कार्यालये आणि अन्न तपासणीच्या प्रयोगशाळा नसल्याचे सांगताना झिरवाळ यांनी भेसळखोरांच्या विरोधात कारवाई करणारे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली केली जाणार नसल्याची ग्वाही देखील झिरवाळ यांनी दिली.
मकोकासाठी विधेयक येणार
दूध भेसळखोरांच्या विरोधात मकोका कायद्याखाली कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे विधेयक आणणार असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले. सध्या करार केलेल्या २२ प्रयोगशाळांकडून अन्न नमुन्यांची तपासणी केली जाते.
शिर्डीत ५०० किलो पेढे जप्त
एफडीएच्या पथकाने शिर्डीतील साई मंदिर परिसराजवळ छापा टाकून भेसळ करणाऱ्या एका नवीन रॅकेटचा पर्दाफाश केला. तपासणीत प्रसादाच्या मिठाईमध्ये भेसळ होत असल्याचे उघड झाले. दुकानांमधून ५०० किलोहून अधिक पेढा जप्त करण्यात आला. ही अशा प्रकारची दुसरी धाड आहे.






