फोटो सौजन्य : टीम नवराष्ट्र
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्री कोण असेल याच्या नावांची घोषणा नुकतीच झाली. त्यामध्ये रायगडसाठी आदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नावे समोर आली आहेत. मात्र, या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक नेते, पदाधिकारी आक्रमक झाले होते. पालकमंत्री बदलण्यासाठी जोर लावला जात होता. अखेर यावर निर्णय घेण्यात आला असून, जाहीर केलेल्या या दोन नावांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी याच पालकमंत्र्यांना ध्वजारोहणाचा अधिकार मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा : महायुतीत वादाची ठिणगी? ‘या’ मुद्यावरून एकनाथ शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस हे या सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. खातेपाटपही झाले. त्यानंतर विविध जिल्ह्यातील पालकमंत्री कोण असेल याच्या नावांची घोषणाही झाली. त्यामध्ये तटकरे आणि महाजन यांच्या नावांना स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. महाराष्ट्रात पालकमंत्रिपदाचा वाद शिगेला पोहोचला आहे. पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड स्थगित करण्यात आली. 19 जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. असे असले तरी प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार असण्याची माहिती समोर आली आहे.
रविवारी रात्री उशीरा पालकमंत्रिपदाला स्थगिती
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचे सरकार असल्याने तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्याच सहमतीने सध्या शासकीय नियुक्त्या, घोषणा केल्या जात आहेत. त्यात नुकतेच विविध जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलं आहे. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील पाहिला मिळाला. या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. रविवारी (दि.19) रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला आहे. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले आहेत. रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद न दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्तही केली आहे.
हेदेखील वाचा : ‘महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद नाहीत, काही कुरबुरी असतील तर…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान