छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चित्ररथ कोकणच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधांचा प्रभावी संगम दाखवणारा ठरला. या वेळी कोकण विभागाच्या उपसंचालक (पर्यटन) डॉ. प्रज्ञा मनोहर यांच्यासह पर्यटन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
चित्ररथामधून कोकणची विस्तीर्ण किनारपट्टी, ऐतिहासिक स्थळे आणि साहसी पर्यटनाचे दर्शन घडवण्यात आले. अरबी समुद्राचे संरक्षण करणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती, गणपतीपुळे मंदिराचा देखावा तसेच कोकणातील निसर्गरम्य होमस्टे व ग्रामीण पर्यटनाचे सादरीकरण प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले.
हायवेवर जळत्या कारचा थरार! Mahindra Electric SUV च्या सेफ्टीवर उठताय प्रश्नचिन्ह? किंमत तर…
यासोबतच स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन प्रतिकृती, जलक्रीडांमधील लोकप्रिय बनाना राइड यांचे कलात्मक सादरीकरण करण्यात आले. कोकणच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रो-रो फेरीची प्रतिकृती हे या चित्ररथाचे मुख्य आकर्षण ठरले. यामुळे कोकणचे नैसर्गिक सौंदर्य, साहसी पर्यटन आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना घेता आला.
चित्ररथासोबत सादर करण्यात आलेले कोकण पर्यटनावर आधारित विशेष गीतही उपस्थितांच्या पसंतीस उतरले. या संचलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाचे देशभर प्रभावी सादरीकरण झाले आणि कोकण पर्यटनाला नवी ओळख मिळाली.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले, “प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ‘कोकण पर्यटन’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. कोकणचा नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा देशभर पोहोचवण्याचा हा प्रभावी प्रयत्न आहे.”
पर्यटन संचालनालयाचे संचालक (भा.प्र.से.) डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले, “या चित्ररथातून पारंपरिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधा यांचा समतोल साधण्यात यश आले आहे. विजयदुर्ग, गणपतीपुळे, जलक्रीडा आणि रो-रो फेरीमुळे प्रेक्षकांना कोकणचा सर्वांगीण अनुभव मिळाला.”






