मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वर्षा बंगल्यावर मध्यरात्री हालचालींना वेग
Manoj Jarange Health Update: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचा निकष लागू करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, मागील दोन दिवसांपासून त्यांनी अन्न-पाण्याचा थेंबही घेतलेला नाही.
उपोषणामुळे शनिवारी (30ऑगस्ट) मध्यरात्री जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना तातडीने पाचारण करण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी पुढील काळात उपोषण सुरू राहिल्यास त्यांची तब्येत झपाट्याने खालावण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Harbhajan Sreesanth Slap Video : ललित मोदीने एस श्रीसंतच्या पत्नीला दिले उत्तर, म्हणाला- मी खरे…
दरम्यान, कालच मुंबईत मराठा उपसमितीची बैठक पार पडली होती. त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आझाद मैदानात जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची आरक्षणाबाबत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याची भूमिका स्पष्ट केली. शिष्टमंडळ माघारी परतल्यानंतर शनिवारी रात्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गेले. तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यानंतर गिरीश महाजन आणि विखे पाटील गुपचूप वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले. उपोषणामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीची भूमिका घेतली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या चर्चेत विखे पाटील यांनी न्यायमूर्ती शिंदे आणि उपोषणस्थ मनोज जरांगे पाटील यांच्यात झालेल्या संवादाचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. यापूर्वीच मराठा उपसमिती व शिंदे समिती यांच्यात बराच वेळ चर्चा झाली होती. तसेच उपसमितीच्या स्वतंत्र अशा दोन बैठकाही पार पडल्या होत्या. जरांगे पाटील यांच्या ठाम मागण्या पाहता सरकार कोणता मार्ग काढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा उपसमितीची बैठक बोलवण्यात आली असून, त्यामध्ये सखोल चर्चा होणार आहे.
देशातील अनेक राज्यांत पावसाचा तडाखा; सात राज्यांत अलर्ट जारी, उत्तराखंडमध्ये कोसळली दरड
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांचा आज तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात रविवारी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनासाठी आलेल्या बांधवांची खानपानाची व्यवस्था राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाकडून केली जात आहे. सकाळपासूनच नाश्त्याचे वाटप सुरू असून, महानगरपालिका कार्यालयासमोर केळी, सफरचंदे यांसह इतर खाद्यपदार्थ दिले जात आहेत. अनेक टेम्पोतून नाश्ता वितरित होत असून, आंदोलकांना पुरेशा प्रमाणात जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.