मध्य रेल्वेवर १५ तासांचा विशेष ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन रद्द, कसं असणार वेळापत्रक?
मुंबई लोकल आणि मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवा आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे ३ मेल एक्स्प्रेस आणि ५९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
८०३ मीटर लांब, १७.२ मीटर रुंद…, मुंबईचा महालक्ष्मी केबल ब्रिज कधी खुला होणार?
सीएसएमटी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १२ आणि १३ची लांबी २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशामध्ये मध्य रेल्वेने दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे मध्यरात्रीच्या वेळी हा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री ५ तासांचा. तर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहिला ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शुक्रवारी रात्री ११.३० ते शनिवारी पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दुसरा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा/ वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धिम्या मार्ग/ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ९.१५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवेवर होणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकलसेवा रद्द राहणार आहेत. या दोन दिवसीय ब्लॉक कालावधीमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. तर ४७ मेल-एक्स्प्रेसवर या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबवण्यात येणार असून त्याच स्थानकावरून त्या परतीचा प्रवास सुरू करतील.
या ब्लॉक कालावधीमध्ये पुणे-सीएसएमटी डेक्कन, पुणे-सीएसएमटी इंटरसिटी आणि नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. प्रवाशांनी या कालावधीमध्ये मेल-एक्स्प्रेसच्या सविस्तर थांब्यांसाठी मध्य रेल्वेच्या वेबसाईटवरून माहिती घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.