महिलांच्या सुरक्षेसाठी 'बेस्ट'चा मोठा निर्णय! (Photo Credit - X)
पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर ॲक्शन मोड!
मुंबईत महिला आणि अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रेल्वे आणि वस प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एक प्रमुख मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त कार्यालयाने बेस्ट उपक्रमाला सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या खाजगी कंत्राटदारांकडून चालवल्या जाणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, परंतु बेस्टच्या मालकीच्या बसेसमध्ये कॅमेरे नाहीत. यामुळे छेडछाड आणि खिसेमारीच्या घटना घडत आहेत. बसेसवरील सीसीटीव्ही कॅमेरे गुन्हेगारांना ओळखण्यास आणि तपास करण्यास मदत करतील.
कशी असेल नवी यंत्रणा?
एकूण बसेस: बेस्टच्या मालकीच्या २४९ बसेस.
कॅमेऱ्यांची संख्या: ४०० हून अधिक नवीन कॅमेरे बसवले जातील.
निविदा प्रक्रिया: सीसीटीव्ही पुरवण्यासाठी निविदा प्रक्रिया (Tender Process) सुरू करण्यात आली आहे.
प्रत्येक बसमध्ये दोन ‘तिसरे डोळे’
१. पुढील बाजू: चालकाजवळच्या पायऱ्यांपाशी, जेथून चढणाऱ्या-उतरणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवता येईल.
२. मागील बाजू: बसच्या शेवटच्या भागात, ज्यामुळे संपूर्ण बसमधील हालचाली स्पष्ट दिसतील.
३. रिव्हर्स कॅमेरा: अपघात टाळण्यासाठी बसच्या मागे अतिरिक्त कॅमेरा असेल, ज्याद्वारे चालकाला मागचे दृश्य स्पष्ट दिसेल.
खासगी बसेसचाही होणार आढावा
खासगी कंत्राटदारांच्या बसेसमध्ये आधीच कॅमेरे आहेत. मात्र, ते सुरू आहेत का? फुटेजची गुणवत्ता कशी आहे? आणि तपासात त्याचा उपयोग होतोय का? याची कडक तपासणी केली जात आहे. ज्या बसेसचे कॅमेरे खराब आहेत, तिथे नवीन कॅमेरे बसवण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.






