निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! (Photo Credit - X)
कामगारांत आनंदाचे वातावरण
नवी मुंबईत दहा ते पंधरा ठिकाणी कामगार नाके आहेत. त्याशिवाय लहान-मोठ्या चौकात दरररोज सकाळी रोजंदारीच्या शोधात कामगारांचा मेळा भरतो. अंदाजे नवी मुंबईत आठ ते दहा हजार नाका कामगार आहेत. यात परप्रांतीयांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते. यातील प्रत्येकाला दरदिवशी रोजगार मिळतोच असे नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे यातील प्रत्येकाला आता रोजगाराची हमी मिळाली असून निवडणुका होईपर्यंत तरी रोजगाराचा प्रश्न मिटल्याने कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.
कंत्राटदार बजावणार मध्यस्थीची भूमिका
प्रचार कामात सहभागी होणाऱ्या पुरुष कामगाराला दिवसाला किमान ५०० आणि बाईकसह रॅलीसाठी १५०० तर महिलांना ५०० रुपये दिले जातात, त्याशिवाय नाष्टा व प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बांधकामासाठी कामगार पुरविणारे कंत्राटदारच नाका कामगार आणि नेते यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावतात. त्यामुळे वेळापत्रकानुसार या कामगारांना निश्चित ठिकाणांवर सोडण्याची जबाबदारी काही कंत्राटदारांनी घेतल्याचे समजते.
उपाशीपोटी प्रचारात झोकून देणारे कार्यकर्ते कालबाह्य
उपाशीपोटी प्रचारात झोकून देणारे कार्यकर्ते आता कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी आता नाका कामगारांची गरज भासू लागली आहे. प्रचाराची पत्रके वाटणे, फलक व होर्डिंग लावणे, रॅलीतील गर्दी वाढविणे, घोषणा देणे आदी कामांसाठी बहुतांशी नेत्यांची भिस्त नाका कामगारांवर असल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात प्रचाराच्या रॅलीसाठी महिला कामगारांना अधिक पसंती असल्याचे समजते.
गेल्या आठ दिवसांपासून कामगारांची सख्या रोडावली
दिघा (महापालिका तलाव), ऐरोली नाका, नोसिल नाका, घणसोली (दगडू चाहू पाटील चौक), कोपरी गाव (हनुमान मंदिर सर्कल), कोपरखैरणे (रांजणदेवी चौक), कोपरखैरणे (सेक्टर ६), वाशी (सेक्टर १५), नेरूळ (एलपी सिग्नल), तुर्भे नाका, पावणे गाव, सीबीडी (सेक्टर २) ही शहरातील काही प्रमुख कामगार नाके आहेत. मागील आठ दिवसांपासून या नाक्यांवरील कामगारांची संख्या रोडावल्याचे दिसून आले आहे.
हे देखील वाचा: Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?






