रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक , वाचा वेळापत्रक (फोटो सौजन्य - X)
Railway Megablock News Marathi: तुम्ही जर लोकलने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत रविवारी, म्हणजेच 15 जूनला रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावरही 5 तासांची मेगा ब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेने १५ जून २०२५ रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. उपनगरीय स्थानकांवर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे हा मेगा ब्लॉक करत आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील गाड्या रद्द तसेच काही लोकल गाड्या विलंबाने धावतील. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या मेगा ब्लॉकमुळे सीएसएमटी मुंबई-विद्याविहार अप आणि डाउन स्लो गाड्या सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत असणार आहे.
सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन गाड्या सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन फास्ट मार्गावर वळवल्या जातील आणि या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, विद्याविहार स्थानकावर त्या पुन्हा डाउन स्लो मार्गावर वळवल्या जातील.
घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (पोर्ट लाईन वगळता) प्रभावित राहतील. सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत पनवेलहून सीएसएमटी मुंबईसाठी निघणाऱ्या अप हार्बर मार्गाच्या सेवा आणि सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत सीएसएमटी मुंबईहून पनवेल/बेलापूरसाठी निघणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत पनवेलहून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी विभागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात पोर्ट लाइन सेवा उपलब्ध असतील.
१५ जून २०२५ रोजी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गांवर चालवल्या जातील. परिणामी, प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने या गाड्या विलेपार्ले स्थानकावर थांबणार नाहीत आणि जलद मार्गांवर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर स्थानकावरही थांबणार नाहीत. तथापि, हार्बर मार्गावरील विलेपार्ले आणि राम मंदिरसाठी सेवा उपलब्ध असतील. या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील आणि बोरिवली आणि अंधेरीहून काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावतील. अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.