मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Case) आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर (Nitesh Rane Bail Hearing) उद्या सुनावणी होणार आहे. आज कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
१८ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Bank Election) पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात आमदार नितेश राणे यांचाही समावेश असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी नितेश राणे अचाकन अज्ञातवासात गेले.
दरम्यान, ३० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. हा राणे कुटुंबासाठी धक्का मानला गेला. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत, अनेक गोष्टींचा खुलासा केला होता, व आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू असं राणेंनी म्हटले होते. त्यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज १७ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतू त्यानंतर २७जानेवारीला नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावला. मात्र, त्यावेळी त्यांना १० दिवस अटकेपासून संरक्षण देण्यात आलं. तसंच त्यांना खालच्या कोर्टात शरण जाण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर २८ जानेवारी रोजी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी रितसर अर्ज केला.
दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना १० दिवस अटकेपासून संरक्षण देण्यात आलं. त्याच दिवशी रात्री नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. त्या दिवशी न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर कोर्टाच्या बाहेर राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली होती. यावेळी वातावरण तणावाचे झाले होते. त्याच म्हणजे मंगळवारी उशिरा शांततेचा भंग केल्यामुळं माजी खासदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी २ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज नितेश राणेंनी मागे घेतला. तसंच दिवाणी न्यायालयात शरण गेले. तिथे सरकारी वकिलांकडून नितेश राणे यांच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यापूर्वी त्यांची वैदकीय चाचणी करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यामुळं त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे, जामीन अर्ज मंजूर झाला तर, त्यांना त्यांना अटकेपासून काही काळ लांब राहता येणार आहे, पण दोन दिवसांची पोलीस कोठडी ही शिक्षा मात्र निश्चित असल्याचं बोललं जात आहे.दरम्यान आज या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद कोर्टाने ऐकून घेतला आहे. मात्र जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. उद्या नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.