नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export) 40 टक्के कर लावल्यामुळे कांद्याचे दर पडले. त्यामुळे नाशिकसह नगर जिह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव (Onion Auction) बंद पाडले. त्यामुळे केंद्र सरकारने नाफेडमार्फत दोन लाख टन कांदा 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याची घोषणा केली. त्यानंतर नाफेडने कांदा खरेदी सुरू केली; पण अचानक प्रतिक्विंटल 125 रुपये 13 पैसे दर पाडून 2 हजार 274 रुपये 83 पैशांनी खरेदी करण्यास सुरुवात केली.
त्यात आधीच अडचणीत असलेला शेतकरी संतप्त झाला असून, केंद्राकडून कांदा उत्पादकांची लूट चालविल्याची भावना निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना फटका: साडेसात हजार टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आला. पण अचानक नाफेडने कांद्याचे दर 125 रुपये 13 पैशांनी कमी केले आणि 2 हजार 274 रुपये 83 पैसे दराने खरेदी सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
केंद्रीयमंत्र्यांनी हात झटकले
या संदर्भात शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना संपर्क केला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न देता हात झटकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला.