पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी 'नापास'; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका (File Photo : Nagpur University)
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालात झालेल्या चुकीमुळे एका विद्यार्थ्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सर्वेश उमेश घाटोळे असे विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला त्याची गुणपत्रिका दुरुस्त करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.
न्या. अनिल किलोर व न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावली व उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. महत्त्वाचे म्हणजे सर्वेश विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचा विद्यार्थी असून, त्याने बॅचलर ऑफ आर्ट्सच्या पहिल्या सत्राची परीक्षा दिली आहे.
२९ जानेवारी २०२५ रोजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर झाला. ज्यात सर्वेशला ‘व्होकेशनल स्किल कोर्स-ऑर्गनायझिंग सोशल सर्व्हे’ आणि ‘स्किल एन्हांसमेंट कोर्स-वर्किंग विथ कल्चर’ या दोन विषयांमध्ये पूर्ण गुण मिळाले असतानाही, गुणपत्रिकेवर ‘ # (हॅशटॅग) हे चिन्ह दर्शवण्यात आले, ज्याचा अर्थ ‘नापास’ असा होतो.
अनेक विद्यार्थ्यांसोबत हीच समस्या
निकाल जाहीर झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांसोबत हीच समस्या समोर आली. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर प्राचार्यांनी २० व २७ मार्च रोजी विद्यापीठाला पत्र लिहून लक्ष वेधले. तरीही विद्यापीठाने सुधारणा केली नाही. अखेर निराश होऊन सर्वेशने उच्च न्यायालयात धाव घेतली.
गुणपत्रिका तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश
मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा सर्वेशने याचिकेत केला आहे. शिवाय संविधानातील अनुच्छेद १४, १९ आणि २१ नुसार मिळालेल्या अधिकारांचे संरक्षण करण्याची तसेच त्याची गुणपत्रिका तात्काळ दुरुस्त करण्याचे आणि न्याय देण्याचे निर्देश देण्याची विनंती केली.
हेदेखील वाचा : Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान