बालविवाह बंदी कायद्याआडून बालविवाह सुरूच; कायद्याच्या भीतीने लग्न न करताच एकत्रित राहण्याकडे कल
वयाच्या अठरा वर्षाच्या आतील मुलींचे लग्न करणे बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा असला तरी अजूनही आदिवासीप्रवण अतिदुर्गम वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी समाजात कोणालाही कळू न देता बालविवाह सुरूच असल्याचे कळते. या गुन्ह्यांपासून सुटका करण्यासाठी लहान वयातच लग्न न करताच मुलगा मुलगी एकत्रित राहण्याकडे त्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येते. पुढे त्यांना झालेली मुले मोठी झाल्यानंतर विविध सामाजिक संस्थातर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करतात. परंतु त्याचे गंभीर परिणाम मुलींच्या आरोग्यावर तसेच त्यांच्यापासून होणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष श्रॉफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. प्रेरणा राऊत आणि प्रा. विद्या दहिसरकर यांच्या संशोधनात्मक अभ्यासातून पुढे आले आहे.
वयाच्या अठरा वर्षाच्या आत ज्या मुलींचे विवाह होतात अशा सर्व स्त्रिया अल्पवयीन विवाहित या गटात येतात. अशा प्रकारच्या विवाहांना पारंपारिक जातीनिहाय रूढी, परंपरा, आर्थिक दुर्बल्य, अल्पवयीन मुला मुलींमधील लैंगिक आकर्षण, वाढती लोकसंख्या, शिक्षणाचा अभाव, जाणिवा व जनजागृतीचा अभाव ही आणि अशी अनेक कारणे बालविवाहास सहायभूत ठरणारी आहेत.
बालविहांचा विचार करता त्याचे प्रमाण शहर, निम शहर, ग्रामीण, अतिदुर्गम भाग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहे. बालविवाहाचे प्रमाण प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रात कमी होत असले तरी ते पूर्णपणे कमी झालेले नसल्याची बाब अभ्यासातून पुढे आली आहे. ज्या स्त्रियांना बालविवाहाच्या समस्येला अगदी लहान वयात सामोरे जावे लागले अशा विविध गटातील ५५ स्त्रियांची संशोधनात्मक अभ्यासासाठी डॉ. प्रेरणा राऊत आणि प्रा. विद्या दहिसरकर यांनी निवड केली होती. प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखतीतून बालविवाहा सारख्या अघोरी आणि अनेक अनिष्ट परिणाम करणाऱ्या प्रथेवर झगमगीत प्रकाश पडू शकला आहे. त्यांच्या मुलाखतीतून लहान वयातच मुलींना विवाह करण्यास कसे भाग पाडले जाते. लग्नासाठी समाजाचा दबाव कसा असतो, अंधश्रद्धा प्रथा परंपरांचा या समाजावर किती आणि कसा पगडा आहे.
बालविवाहाची ज्ञात कारणे समजून घेण्यासाठी बालविवाहास बळी पडलेल्या ५५ स्त्रियांची झालेले संभाषण तसेच संबंधित स्त्रियांचे सामाजिक, आर्थिक, त्यांच्या वाड्या वस्ती परिसरातील पर्यावरण, सदृस्थितीत त्यांच्या आरोग्याबाबतच्या समस्या यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. अभ्यासाच्या निष्कर्षातून बालविवाहा मागील समोर आलेली कारणे अनेक असली तरी त्यातील मुख्य कारण म्हणजे पहिला शिक्षणाचा अभाव संबंधित मुलगी आणि त्यांच्या पालकांचा अशिक्षितपणा, लग्नानंतर होणाऱ्या परिणामांची माहिती नसणे आणि निर्णय क्षमतेच्या अभावी बालविवाहास सामोरे जावे लागते.
गरीबी आणि घरातील मुला मुलींची जास्तीची संख्या कुटुंबाचे उत्पन्न अगदीच सुटपुंजे व घरात खाणारी तोंडे जास्त असल्याने सर्व मुलांचे पालन पोषण करणे अशक्य असते. अशावेळी जबाबदारीतून मुक्तता मिळवण्यासाठी मुलीचे लग्न लवकरात लवकर करून दिले जाते. सामाजिक दृष्टिकोन व कौटुंबिक दबाव -मुलींचे खरे घर त्यांच्या सासरीच असते असा सामाजिक दृष्टिकोन असल्याने लहान वयातच लग्न करण्यास समाजाची मान्यता असते, लग्न न झाल्यास लोकांकडून सतत विचारणा होते, त्यामुळे विवाह करण्यासाठी समाजातून दबाव येतो. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींचे वरील कारणामुळे विवाह झाल्याची उदाहरणे आहेत.