धक्कादायक! 24 गावांना दूषित पाण्याचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील जवळपास चोवीसच्यावर गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी निर्जंतुकीकरणाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने या गावांना दूषित पाण्याने ग्रासले असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्या जात असल्याचे भीषण चित्र आहे.
पहाटेच्या वेळी अनेकांना हृदयविकाराचा झटका का येतात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
जिल्ह्यात नद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या नदी, नाल्यावर जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीवाटे गढूळ पाणी येत आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत स्तरावार पाणी शुद्धिकरण यंत्र नसल्याने तसेच स्थानिक प्रशासनाने पाणी निर्जंतुकीकरणासाठी फारसे प्रयत्न न केल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जिल्ह्यातील चामोर्शी, आरमोरी, अहेरी, भामरागड, देसाईगंज तालुक्यातील 2 डझनभर गावात दूषित पाण्याचा पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील अहेरी तालुका मुख्यालयासह गडअहेरी यासह परिसरातील काही गावे तसेच चामोर्शी तालुक्यातील सगणापूरसह परिसरातील गावे, आरमोरीतील गाढवी नदीअंतर्गत पाणीपुरवठा होत असलेल्या आरमोरी शहरातील काही वॉर्डासह अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्लिचिंग पावडर खरेदी ग्रामपंचायत स्तरावर होणे अपेक्षित आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतरही ग्रा. पं. प्रशासन ढिम्म
पावसाळ्यात जलजन्य व साथीच्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याबाबत विशेष खरबदारी घेणे आवश्यक आहे. शिवाय हातपंप, विहीर, नळ व इतर पाणी स्रोताच्या सभोवताल स्वच्छता राखणेही गरजेचे आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग, तालुका व जिल्हा प्रशासन वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देऊन कार्यवाही करण्यास सांगत आहे. मात्र, असे असतानाही संबंधित ग्रा. पं. प्रशासन ढिम्म असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
– अनेक ग्रा. पं. ना पावसाळ्यातही ब्लिचिंग पावडरचा विसर
पावसाळ्यात वाढणारे जलजन्य आजार लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभागांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता नियमित ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याचे सक्त सूचना केल्या जात आहेत. मात्र, काही ग्रामपंचायती पावसाळ्यातही ब्लिचिंग पावडर खरेदीत टाळाटाळ करण्यासह स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे भीषण वास्तव आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना नेहमीच आरोग्याशी – संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सगणापुरात दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना विषबाधा
15 दिवसांपूर्वी चामोर्शी तालुक्यातील सगणापूर या गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील 8 ते 10 नागरिकांना विषबाधा होऊन रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले होते. नळ योजनेची पाइपलाइन फुटल्याने दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने ग्रामस्थांना उलट्या, हगवण, मळमळीचा त्रासाला सामोरे जावे लागले होते. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने बेजबाबदारपणामुळे ग्रामवासीयांवर ही स्थिती ओढावली होती. वेळीच तालुका प्रशासनाने उपाययोजना केल्याने जलजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.
जिल्हा पातळीवर अद्यापपर्यंत तक्रारी आल्या नसल्याची माहिती
ग्रामीण भागातील दूषित पाणीपुरवठा संदर्भात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील संबंधितांना विचारणा केली असता. दूषित पाणीपुरवठा संदर्भात जिल्हा पातळीवर अद्यापपर्यंत तक्रारी आल्या नसल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत प्रशासनाला पाणी निर्जंतुकीकरणासह हातपंप, विहिरीत नियमित ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली.
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा, नोट करून घ्या पदार्थ
गावोगावी वायरल फिव्हरचा प्रकोप
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वायरल फिव्हरचा प्रकोप सुरू असून, गावागावात अनेक नागरिक तापाने फणफणत आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, उलटी, अतिसार व इतर जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात बळावल्याने या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचीही संख्या सध्या जिल्ह्यात वाढताना दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाचे शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतच्या कार्यवाहीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा जलजन्य आजारातून नागरिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.