नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिस आयुक्त यांची पत्रकार परिषद (फोटो- सोशल मिडिया)
नागपूर: काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत पोलिसांवर हल्ले करण्यातब आले. त्यानंतर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या लोकांना सोडणार नाही अशा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपूर हिंसाचारात फहीम खान हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान आज नागपूर पोलिस आयुक्त यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक सूचना जारी केल्या आहेत.
नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करू नयेत. सोशल मिडियाचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे व्हिडिओ पोस्ट करू नयेत. यूट्यूबवर पोलिसांची नजर असणार आहे असे आयुक्त रवींद्र सिंघल म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही 144 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. 13 जणांवर एफआयआर दाखल झाले आहे. तसेच आणखी काही लोकांना अटक करण्यात येत आहे. ज्या लोकांचे नाव निष्पन्न होईल त्यावरही अशाच पद्धतीची कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिला आहे.
पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आम्ही तयारी सुरू केली आहे. नागपुरात हिंसाचार घटनेला सात दिवस लोटलेले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत आहे. पंतप्रधान यांच्या दौऱ्यात यांच्या सुरक्षेत कुठलीही तडजोड होणार नाही. नागपूर पोलीस दौऱ्यात सुरक्षा पुरवण्यासाठी तयार आहेत.
दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार – मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पोलिस मुख्यालयात शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली. नागपूर हिंसाचारानंतर केलेल्या कारवाईबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, सोशल मीडियावरील अफवांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. दंगलखोरांची ओळख पटवली आहे. आम्ही त्यांना नुकसान भरपाई करायला लावू. ज्या दंगलखोरांनी पोलिसांना लक्ष्य केले त्यांना आता त्याचे परिणाम भोगावे लागतील. सोशल मीडियावरील प्रक्षोभक पोस्टवरही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पोस्ट टाकणाऱ्यांनाही आरोपी मानले जाईल. आतापर्यंत आम्ही अशा अनेक पोस्ट काढून टाकल्या आहेत.
Nagpur Violence: ‘दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल’, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले की, हिंसाचारात सहभागी असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विशेषतः ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांना करावी लागेल. त्याची मालमत्ताही जप्त केली जाईल. जिथे बुलडोझर चालवण्याची गरज असेल तिथे बुलडोझर चालवला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही.