विधान परिषद निवडणुकीत महाविकासचे पत्ते उघड; महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकजूट करण्याची तयारी
विधान परिषदेच्या स्थानिक संस्था निवडणूकीसाठी मतदानाला अवघे दोन शिल्लक असून, जागा वाटप व उमेदवार निवडीवरून महायुतीत गेली आठ दिवस सुरू असलेल्या महाभारतावर तुर्त पडदा पडलेला दिसत आहे. त्यातून शिंदे सेना व भाजपाचे मतदार एका पाठोपाठ सहलीवर रवाना झाले तर राष्ट्रवादीचीही नाराजी काढून ते देखील कळपात सामील झाले आहेत. महायुतीची ही धडपड दगाफटका रोखण्यासाठी असली तरी, गेल्या आठ दिवसांपासून महायुतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या महाविकास आघाडीने अखेरच्या टप्प्यात निवडणूकीत रंग भरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
गिते यांच्या माघारीनंतर सर्व सुरळीत असल्याचे चित्र असले तरी कोणताही चोका पत्करायचा नाही, या भूमिकेतून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महत्वाची रणनीती आखली आहे. येवला, मनमाड आणि नांदगाव परिसरातील नगरसेवकांची मुंबई येथे सहल आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून संबंधित नगरसेवकांना निवडणुकीपर्यंत एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे मुंबईला रवाना करण्यात आलेल्या नगरसेवकांना मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर आणण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नगरसेवकांचे मतदान निर्णायक ठरत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात आहे. बंडखोरीची चर्चा ओसरली असली तरी महायुतीकडून सावधगिरीची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. नगरसेवकाना मुंबईत हलवण्याच्या निर्णयामुळे राजकीय चर्वांना उधाण आले आहे. नगरसेवकांना मुंबईत हलवण्याच्या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे सेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी, विधान परिषद निवडणूकीत महाविकासची भूमिका महत्वाची राहणार असल्याचे सांगून, महायुतीच्या विरोधातील उमेदवाराला महाविकासचे समर्थन असेल असा दावा करून निवडणूकीत चुरस वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. आज, उद्यापर्यंत महाविकास आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगतांनाच या निवडणूकीबाबत काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी अप्रत्यक्ष संपर्क केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्याच बरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश खखैरे यांनीही महाविकासची भूमिका महायुतीच्या विरोधातील स्पष्ट असल्याचे सांगितले. काहींनी आपली भेट घेवून पाठिंब्यासाठी गळ घातल्याचे ते म्हणाले. या संदर्भात आजच कॉंग्रेसचे महापालिकेचे गटनेते सुफी जीन यांच्याशी चर्चा झाली असून, मतदानाच्या काही तास अगोदरही पक्ष भूमिका जाहीर होऊ शकते असे सांगितले.
विधान परिषदेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीने अधिकृत नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देवून समर्थक गोकूळ गिते, प्रसाद हिरे यांना माघारीसाठी भाग पाडले तरी, मतपत्रिकेवर तीन उमेदवारांची नावे आहेत. महाविकासकडून दराडे यांना पाठबळ मिळाणार नसला तरी, उर्वरित दोन उमेदवार रिंगणात असल्याने त्यापैकी एकाच्या पारड्यात मतांचे बळ पडू शकते.






