द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात! दीड लाख हेक्टरवरील द्राक्ष बागा कुजल्या (Photo Credit - X)
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्याला गेल्या महिन्याभरापासून अति आणि अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे येथील सुमारे एक ते दीड लाख हेक्टरवरील द्राक्ष बागा मोठ्या संकटात सापडल्या आहेत. नाशिक जिल्हा हा द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखला जातो, पण सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात दीड ते पावणे दोन लाख हेक्टरवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत सुरूच राहिल्याने द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षांना छाटणीपासून, फळधारणा अशा तिन्ही टप्प्यांत पाऊस सुरू राहिल्याने जिल्ह्यातील ५० टक्के द्राक्ष बागा ‘फेल’ गेल्या आहेत. उरल्या सुरल्या बागाही अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्या असून, फळधरणेच्या स्थितीतील द्राक्ष वेली कुजण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास ७५ टक्के बागा पूर्णतः प्रभावित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बागा वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसत आहेत.
जिल्ह्यात प्रामुख्याने निफाड, नाशिक, दिंडोरी, तसेच कळवण, सटाणा आणि बागलाण तालुक्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सप्टेंबर महिन्यात द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरुवात झाली असली तरी, अगदी काही प्रमाणातच बागांनी चांगला फुटवा धरला आहे. ऑक्टोबरमध्ये छाटणी झालेल्यांपैकी ५० टक्केच बागा चांगल्या स्थितीत होत्या, पण त्याही अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या.
Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट
द्राक्ष शेतीचे नुकसान झाल्यामुळे द्राक्ष विक्रीसह बेदाणा आणि इतर संलग्न व्यवसाय देखील धोक्यात आले आहेत. जिल्ह्यात ‘अर्ली द्राक्षांचे’ उत्पादन काही भागात घेतले जाते, ज्याची बाजारात चांगली मागणी असते. मात्र, यावर्षी अवकाळी पावसामुळे या बागांचा हंगाम लांबला आहे. डिसेंबरमध्ये या द्राक्षांचे उत्पादन अपेक्षित आहे. नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात देशात अग्रेसर असल्याने, द्राक्षाच्या निर्यातीत राज्याचा ११ टक्के वाटा आहे. या नुकसानीमुळे राज्याच्या परकीय चलनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही काही ठिकाणी काढणी सुरू झाली होती. मात्र, मागील ९ दिवसांत (१९ ते २६ सप्टेंबर) १८१ हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष, कैलास भोसले यांनी प्रतिक्रिया दिली की, “झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पुढील वर्षीच्या पीक विम्याची भरपाई करण्याबाबत सरकारने विचार करावा.”






