अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट (फोटो सौजन्य-X)
नाशिक : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान झाल्याने कांदा उत्पादकांचे गणित बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. यात ऑक्टोबर महिन्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाची आणखी भर पडली आहे. अवकाळीच्या या तडाख्यात जिल्ह्यातील मका, सयोबीन पिकांसह उन्हाळी कांदा रोपांचे नुकसान झाले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मागील महिन्यात देखील अतिवृष्टीने रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हाती कांद्याचे रोपच शिल्लक नसल्याने लागवडीसाठी रोप आणणार कोठून असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांनी आता उन्हाळ कांद्याचे नवीन बियाणे तयार करायचे ठरवल्यास जमिनीचा वाफसा होण्यासाठी किमान २० दिवसांचा कालावधी लागणार आहे, वाफसा झाल्यानंतर पेरणी केलेले बियाणे फेब्रुवारी महिन्यात लागवडीस येणार आहे. परंतु फेब्रुवारी महिन्यात कांदा पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आणि पोषक ठरणारी थंडी नसते. एकूणच या सर्व परिस्थितीचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्हे आहेत.
अतिवृष्टी आणि अवकाळीने कांदा रोपे जवळपास पूर्णतः नष्ट झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत पुन्हा महागाचे कांदा बियाणे आणून रोप तयार करण्याची मानसिकता शेतकऱ्याऱ्यांची राहिलेली नाही. याशिवाय आता टाकलेले बियाणे फेब्रुवारीत लागवडीस येईल. या महिन्यात थंडी जास्त नसते. परिणामी उत्पादन घटणार. १ एकर लागवडीसाठी ५० हजार रुपयांचा खर्च येतो. आधीच शेतकरी आर्थिकदृष्टया संपूर्ण कोलमडला असून आता पैसे कुठून आणणार? असा सावाल शेतकरी नेते राजेंद्र डोखळे यानी व्यक्त केला.
यंदा सततच्या पावसामुळे चाळ्यामध्ये ओलसरपणा शिरला, त्यामुळे कांद्याचे कुजणे आणि अंकुर फुटणे सुरू झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी चाळ्यांची छपरे गळत असल्याने आणि हवामान दमट झाल्याने कांद्याचा दर्जा घसरला आहे. परिणामी, बाजारात दर्जानुसार दरात मोठी तफावत निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होऊन उन्हाळ कांद्याचा पुरवठा कमी होणार आहे. देशातील बहुतांश बाजारात कांद्याचा पुरवठा नाशिक, नगर, लासलगाव, येवला या बाजार समित्यामधून केला जाती, यंदा या भागातील उत्पादन घटून देशातील कांदा निर्यातवरही प्रभाव पडणार आहे. असे झाल्यास केंद्र सरकार अंतर्गत पुरवठा प्राधान्याने सुरु ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा आयात करेल. परिणामी भाव देखील कोसळणार आहे. त्यामुळे, शेतक-यांसाठी सध्याची परिस्थिती ही दुहेरी संकटासारखी झाली आहे.






