 
        
        नाशिकमध्ये १,१५० तर त्र्यंबकेश्वर २२५ एकरवर साधूग्राम, झीरो आऊट ब्रेक डीसिसला प्राधान्य
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये १ हजार १५० तर त्र्यंबकेश्वरमध्ये २२५ एकवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कुंभमेळा आयुक्त शेखरसिंह यांनी दिली आहे.आयुक्त शेखरसिंह यांनी जिल्हा परिषेदच्या मध्यवर्ती सभागृहात गुरुवार (दि. ३०) वार्तालाप करीत कुंभमेळासाठी सुरु असलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी बोलताना आयुक्त शेखरसिंह म्हणाले, नाशिकमधील साधूग्रामसाठी १ हजार १५० एकर जागा अपेक्षित आहे. सध्या ३७७ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ९४ एकर जागेचे भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
तसेच २७७ एकर जागा कायमस्वरूपी आखाड्यांना देण्याचा विचार सुरु आहे. तर त्र्यंबकेश्वर साधूग्रामसाठी २१२ एकर जागेच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. नाशिककर नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने शिक्षणस्थ कुंभमेळा पार पडणार असून, भाविकांच्या सुरक्षिततेला प्रधान्य देण्याबरोबरच झिरो आऊटब्रेक डीसीसला प्राधान्य देणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. कुंभमेळयासाठी प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या देखरेखाली कुंभमेळ्याचे कामे पूर्णत्वास नेले जाणार आहे. कमी वेळात जास्त कामे मार्गी लावावी लागणार असल्याची कबुली यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी देतानाच सर्व कामे दर्जेदारच केली जातील, अशी ग्वाहीही दिली.
कुंभमेळ्याचे नियोजन आणि सुरु असलेल्या कामांची माहिती देतांना शेखर सिंह म्हणाले, सुरक्षित कुंभ करण्यावर आणि डिजीटीलायझेशनवर भर दिला जात आहे. ८ ते ९ कोटी भाविक कुंभमेळ्यास येण्याचा अंदाज असून, त्यांची सुरक्षितता जपणे मोठे आव्हान राहणार आहे. ही एक तारेवरची कसरत असून गर्दीचे अचूक नियोजन आम्ही करीत आहोत. या कामात स्थानिक नागरिक, सामाजिक, आद्योगिक आणि बांधकाम संघटनांना देखील सहभागी करून घेणार आहोत.






