Navi Mumbai Municipal Corporations Cleanliness Drive Vithumaulis Name Is Mentioned In The Swachhata Dindi Ceremony
नवी मुंबई महापालिकेचा स्वच्छतेचा जागर; स्वच्छता दिंडी सोहळ्यात विठुमाऊलीच्या नामगजर
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे. ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचं महत्व सांगण्यात आलं आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून स्वच्छतेचा जागर करण्यात येत असून त्यासोबतच ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेतून आरोग्य जपणुकीचा संदेशही प्रसारित करण्यात येत आहे. याच अनुषंगाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करावे येथील ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहयोगाने स्वच्छता दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. 600 हून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक यांच्या सहभागाने हा दिंडी सोहळा लक्षणीय झाला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले असताना लहान मुलांना वारीचे महत्व कळावे व दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या मनात आपल्या संस्कृतीची रूजवात व्हावी तसेच स्वच्छता संदेशाचाही प्रसार व्हावा यादृष्टीने आज महानगरपालिकेमार्फत ज्ञानदीप सेवा मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छता आणि प्लास्टिक प्रतिबंधाचा संदेश घराघरात पोहोचेल व उद्याचे शहराचे भविष्य असणा-या या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नवी मुंबई एक आदर्श शहर म्हणून पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी वारकरी वेशात ज्या उत्साहाने या स्वच्छता दिंडी सोहळ्यात सहभागी झाले त्याचे विशेष कौतुक त्यांनी केले.
या दिंडी सोहळ्यात अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांचेसमवेत घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अजय गडदे तसेच परिमंडळ 2 उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे, स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर, वाहतुक पोलीस निरीक्षक श्रीम.मोहिनी लोखंडे, स्वच्छता निरीक्षक श्री.विजय नाईक, श्री. अजित तांडेल, श्री.संजय पाटील, श्री.महेश मोरे, श्रीम.रत्नमाला नाईक तसेच ज्ञानदीप सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र नाईक, चिटणीस श्री. अरविंद नाईक, कार्यकारिणी सदस्य श्री. पंडित तांडेल, मुख्याध्यापक श्री.बंकट तांडेल, दिंडी प्रमुख श्री. हरेश तांडेल आणि शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा व ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा ठेवलेल्या पालखीचे पूजन करून ज्ञानदीप सेवा मंडळाच्या विद्यालयापासून सुरू झालेल्या या स्वच्छता दिंडी सोहळ्यात श्रीविठ्ठल, श्रीरखुमाई, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत मीराबाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सहभाग घेतला. ‘पंढरीनाथ महाराज की जय’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामगजरात लेझीम, टाळ – मृदुंग, शालेय बँडच्या गजरात शाळेपासून सीवूड येथील नेक्सस मॉलपर्यंत जाताना दिंडीतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता संदेशाचे फलक झळकावित, घोषणा देत स्वच्छता संदेशाचे प्रसारण केले.
नेक्सस मॉलच्या पोडियमवर वारीच्या परंपरेनुसार रिंगण घालण्यात आले. यावेळी बाल कीर्तनकार मनिष गजभर याने कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छताविषयक प्रबोधन केले. अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झालेल्या या स्वच्छता दिंडी सोहळ्याप्रमाणेच अभियानाच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये लोकसहभागावर भर दिला जात असून या माध्यमातून स्वच्छतेविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
Web Title: Navi mumbai municipal corporations cleanliness drive vithumaulis name is mentioned in the swachhata dindi ceremony