फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. विखे पाटील यांचा गड समजल्या जाणाऱ्या अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी विजयी गुलाल उधळला. महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली होती. शरद पवार गटाकडून निवणुकीआधी अजित पवार गटातून आलेल्या निलेश लंके यांना संधी देण्यात आली होती. निकालानंतर आता निलेश लंके यांचे विखे पाटील कुटुंबाबद्दल अभिमान असल्याचे वक्तव्य चर्चेत आले आहे.
निलेश लंके काय म्हणाले?
एका कार्यक्रमावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, “लोकसभा निवडणुकीमध्ये मी ज्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीला उभा होतो. पण आता निवडणुकीचा निकाल लागला, निवडणूक झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही. विखे कुटुंबिय हे जिल्ह्यात मोठं कुटुंबिय असून त्यांचं सहकार क्षेत्रात मोठं काम आहे. निवडणूक लढवत असताना त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे. निवडणुकीच्या प्रचारात बोलताना एखादा शब्द माझ्याकडून त्यांच्यावर घसरला असेल किंवा त्यांच्याकडून माझ्यावर घसरला असेल. पण आता तेच मनावर घेऊन बसायचं का?”, असं निलेश लंके यांनी म्हटलं.
मी त्यांना सांगेल मला आशीर्वाद द्या
पुढे ते म्हणाले, “मलाही हे मान्य करावे लागेल की जिल्ह्यात सहकार क्षेत्रात विखे कुटुंबियाचं मोठं काम आहे. मी ज्यावेळी राज्यात फिरतो त्यावेळी मी अभिमानाने सांगतो की, आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी केला. मलाही अभिमान आहे. जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो की, राज्याचे महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातील आहेत. ते विरोधक असले तर त्यांच्याविरोधात काहीही बोलायचं का?” जिल्ह्याचे पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील आहेत. जिल्हा नियोजन समितीची असली की मी सुद्धा त्यांना सांगेल की मला आशीर्वाद द्या. मीही त्यांच्याकडे एखादे काम हक्काने घेऊन जावू जाईल. अशा पद्धतीचे राजकारण असलं पाहिजे. आपण लहान माणसांनी लहान माणसासारखं वागलं पाहिजे”, असे स्पष्ट मत निलेश लंके यांनी मांडले. त्यांच्या या राजकीय भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे.