राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल
मुंबई : राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु, आम्ही आणि जुनी राष्ट्रवादी आणि आमचे सहकारी असे 57 आमदार आहेत. त्यानुसारच, आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची 288 जागा लढवण्याची तयारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सांगितले.
शिवसेना आणि काँग्रेस 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. याच मुद्यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, ‘कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाने सुरुवातीला युती होण्यापूर्वी 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते. आम्ही सुद्धा 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे. जेव्हा आपण युतीमध्ये बसतो तर त्यामध्ये वाटाघाटी करून जागा लढवाव्या लागतात’.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, ‘अजूनही सहा महिने शिल्लक आहेत आणि अनेक जागा सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अधिक जोमाने सरकार काम करेल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
छगन भुजबळ हे यापूर्वी सुद्धा अनेक बाबतीमध्ये अडकले होते. परंतु त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. यातून सुद्धा कोणताही आरोप सिद्ध होणार नाही. ते यातून बाहेर निघतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
एलॉन मस्क यांनी गाड्या बनवण्याचे काम करावं
जगप्रसिद्ध अब्जाधीश एलन मस्क यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानंतर भाजपा आणि सहकारी पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील मस्क यांनी फक्त गाड्या बनविण्याचे काम करावे, फालतूचे सल्ले देऊ नयेत असे सुनावले आहे.