मुंबई : लोकसभा निवडणूका पार पडल्या आहेत. त्याच्या निकालामुळे भाजप व महायुतीला धक्का बसला. नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये वाद निर्माण झाला होता. अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला होता. मात्र तिथे त्यांना युतीधर्मामुळे माघार घ्यावी लागली. त्यानंतर राज्यसभेसाठी देखील इच्छुक असताना पक्षाकडून त्यांना संधी नाकारण्यात आली. यावरुन छगन भुजबळ हे अजित पवार गटावर नाराज आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधून आजही खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अपमान नको म्हणून माझी माघार
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार का घ्यावी लागली याचे स्पष्टीकरण दिले आहे. भुजबळ म्हणाले, मी नाराज नाही. मला खासदार व्हायची इच्छा आहेच. म्हणूनच मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट फायनल केलं होतं. मला सांगण्यात आलं होतं म्हणून मी कामाला लागलो होतो. पण, एक महिना याबाबत काहीच जाहीर करण्यात आलं नाही. हा अपमान नको म्हणून मी माघार घेतली. बारा पंधरा दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी उमेदवार जाहीर झाला. त्याचे परिणाम आपल्याला दिसले. पक्ष म्हटला की सगळं आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. काहीवेळा थांबावं लागतं. आपल्याला वाटतं असं व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. नशिबाचा काही भाग असतो, त्यामुळे काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली खंत व्यक्त केली.
ANI ट्वीट
#WATCH | Mumbai: Maharashtra Minister and NCP leader Chhagan Bhujbal says “We (NCP) were given only 4 seats out of the 48 seats for the Lok Sabha elections. Of those 4 seats, 2 were taken away from us. So, in these 2 seats, Raigad and Baramati and we won 1 seat. Now, how can… pic.twitter.com/SpBgwkbiKl
— ANI (@ANI) June 14, 2024
आरएसएसचं टीका करणं स्वाभाविक
त्याचबरोबर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS कडून अजित पवार यांना युतीमध्ये घेतल्यावरुन टीका केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, आरएसएसची नाराजी स्वाभाविक आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत ते विश्लेषण मांडत आहेत. मात्र राज्यातील 48 जागांपैकी आम्हाला केवळ 4 जागा देण्यात आल्या. त्यातील एका जागेवर महादेव जानकर तर दुसऱ्या जागेवर शिवसेनेतून आलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे लढले. म्हणजे आमच्या पक्षाला लढण्यासाठी फक्त 2 जागा होत्या. एक बारामती आणि दुसरी रायगड आमच्याकडे आले, त्यातील एका जागेवर आम्ही जिंकलो आणि एका जागेवर हारलो. पण या 2 जागेवरुन तुम्ही 48 जागांवर परिणाम झाला असं कसं म्हणू शकता. थोडी पिछेहाट झालेली आहे हे मान्य आहे. पण हे फक्त राज्यामध्ये नाही झालं तर इतर राज्यांमध्ये देखील असेच निकाल आले आहे. युपीमध्ये देखील अशाप्रकारचे निकाल आले आहेत. ४०० पारचा नारा दिला असल्याने महायुतीला फटका बसला. दलित, आदिवाशी युतीपासून दूर गेले. मुस्लीम समाज तर आधीपासूनच दूर गेला होता, असे स्पष्ट मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.