मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा एनडीएचे सरकार निवडून येणार असून, खासदारांचा ४०० पार टप्पा गाठणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी विधानभवनातील निवडणूक कार्यालयात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या आठवड्यात एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे म्हटले होते. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, अनेक चुकीचे आणि दिशाभूल करणारे सर्व्हे येत असतात. मात्र, महायुती राज्यात ४५ जागा जिंकणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार आहे.
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार येणार
पटेल हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांचा खासदारकीचा चार वर्षांचा कालावधी अद्याप बाकी असताना पक्षाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी का दिली, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करण्याची मागणी शरद पवार गटाने राज्यसभा पिठासीन अधिकाऱ्याकडे केली असून, अपात्र होण्याच्या भीतीने पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.