सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात तिला मारहाण, छळ आणि मानसिक जाच झाल्याचे स्पष्ट झाले असून, हुंडा आणि ब्रॅंडेड वस्तूंमधून रक्कम प्राप्त झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या संदर्भात पोलीसांकडे सबळ पुरावे प्राप्त झाले असून, या आधारे तातडीने सखोल तपास करून आरोपपत्र दाखल करण्याची शिफारस महिला व बालकांचे हक्क कल्याण समितीने केली असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधीमंडळाच्या अधिवेशनात मंजूर झालेल्या विधेयकांबाबत माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी १७ महत्त्वाच्या विधेयकांचा थोडक्यात आढावा दिला. जनसुरक्षा विधेयकावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा कायदा माओवादी संघटनांविरोधात आहे, कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हे. जो विचाराने डावा आहे पण माओवादी नाही, त्याला घाबरण्याचे कारण नाही. मराठी भाषेच्या प्रचारासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाला ५० लाख रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदी सक्ती केली गेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून, यासाठी नरेंद्र जाधव समिती स्थापन करण्यात आली आहे.
विधीमंडळात सत्कार होणारे गवई पहिले
भूषण गवई हे महाराष्ट्रातील पहिले सरन्यायाधीश ठरले, ज्यांचा सत्कार विधीमंडळात करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे महत्त्व त्यांनी विषद केले.
पडळकरांमध्ये सुधारणा!
पडळकर-आव्हाड वादावर प्रतिक्रिया देताना गोऱ्हे म्हणाल्या की, पडळकरांमध्ये सुधारणा झालेली आहे, हे त्यांनी स्वतः निरीक्षण केले आहे. जितेंद्र आव्हाड हे पडळकर दिसले की सभागृहाच्या आवारात अश्लाघ्य घोषणांचा वापर करत. यामुळे वातावरण तापले आणि संघर्ष निर्माण झाला. अशा घटना यापूर्वी कधी घडल्या नव्हत्या. ही घटना टाळता आली असती तर बरे झाले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेमकी घटना काय?
राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबात ही घटना घडली. राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा शशांक याची पत्नी वैष्णवी हिने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर वैष्णवीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक आणि तिची सासू आणि नणंद यांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हे पुण्याच्या राजकारणात, विशेषतः मुळशीमध्ये एक मोठे नाव आहे. परंतु त्यांच्याच घरात अशा घटनेचा खुलासा झाल्याने खळबळ उडाली आहे. हुंडा व जमीन खरेदी करण्यासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.