नागपूर शहरात 20 ऑगस्टपासून ट्रॅव्हल्स बसेसना 'नो एंट्री'; पोलिस आयुक्तांनीच काढले आदेश (File Photo : Travels)
नागपूर : नागपूर शहराची बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी कठोर भूमिका घेतली आहे. यानुसार, २० ऑगस्टपासून शहरात कोणत्याही ट्रॅव्हल बसेसना प्रवेश दिला जाणार नाही, असे कडक निर्देश त्यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसेसचे मालक आणि चालकांवर कोणतीही भीती न बाळगता कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत, जेणेकरून शहर सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त होईल.
पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी ही माहिती दिली. शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या ट्रॅव्हल बसेसमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ट्रॅव्हल बसेससोबतच, पोलिस आयुक्तांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कारवाईदरम्यान अनेकदा नागरिक वाहतूक पोलिसांशी वाद घालतात. अशा परिस्थितीत, वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यादरम्यान बॉडी कॅमेरे वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले
सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे वापरण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून अशा घटना घडल्यास त्वरित कठोर कारवाई करता येईल. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स येतात. कुठेही थांबतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. मात्र, आता या निर्णयामुळे शहरातील या प्रकाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
महापालिकेची घेतली जाणार मदत
ट्रॅव्हल बसेसमुळे होणारी कोंडी लक्षात घेऊन, वाहतूक विभागाने नागपूर महानगरपालिकेच्या मदतीने शहराबाहेरूनच खासगी ट्रॅव्हल बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे, या बसेसना शहरातून प्रवासी घेण्याची परवानगी नसेल. प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल टर्मिनसपर्यंत पोहोचवण्याचे काम महानगरपालिकेच्या शहर बस सेवेमार्फत केले जाईल.