नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; कोटीचा दंड वसूल (फोटो सौजन्य-X)
यवतमाळ : बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्याचे काम जिल्हा वाहतूक शाखेने केले आहे. गेल्या ६ महिन्यात दत्त चौक, स्टेट बँक चौक, दाते कॉलेज चौक, आर्णी नाका आदी परिसरात धडक कारवाया केल्या. त्यातूनच यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ महिन्यात ११ हजार २६७ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा दंड वसूल केला.
शहरातील वाहतूक पूर्णतः कोलमडल्याचे चित्र मागील काही महिन्यांपूर्वीपासून बघायला मिळत होते. कुठेही वाहने उभी करणे, भाजीपाल्यासह फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्यावर थाटण्याचे प्रकार स्टेट बँक चौक, दत्त चौक, जाजू चौक, आर्णी नाका परिसरात होत आहे. अशा परिस्थितीत रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना मार्ग काढताना कसरत करावी लागत होती.
बऱ्याचदा मार्ग काढताना किरकोळ वादही निर्माण होत होते. अशात जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पहिल्यांदा हातगाडी चालकांना सूचना दिल्या. त्यानंतर बेशिस्त वाहने चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये बुलेट फटाका सायलेन्सर, ब्लॅक फिल्म, विनाक्रमांक प्लेट, मोबाइलवर बोलणे आणि ट्रीपलसीट अशाप्रकारे ११ हजार २६७ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा दंड वसूल केला.
मद्यप्राशन करून वाहन चालवणे अनेकांना भोवले
शहरात वाहतूक शाखेने मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सकाळपासूनच शहराच्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. वाहतूक पोलिसांच्या पथकांनी अनेक मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांकडून कारवाई
विना सीटबेल्ट वाहन चालविणे वाहन चालवितांना मोबाइलवर बोलणे विमा नसलेले वाहन चालविणे फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसणे वाहनाच्या काचाला काळी फिल्म लावणे ट्रीपल सीट वाहन चालविणे धोकादायकरित्या वाहन चालविणे फटाका सायलेन्सरचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली गेली.
ध्वनिप्रदूषण करणाऱ्या २३४ बुलेटचे सायलेन्सर जप्त
बुलेट बाइकला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वारांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण होते. शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत बुलेटवरून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २३४ वाहनांचे सायलेन्सर काढून जप्त केले.