हिंगोलीमध्ये आघाडीच्या बैठकीला नेत्यांची उपस्थिती नाही (फोटो - सोशल मीडिया)
हिंगोली: मकरंद बांगर: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.त्यामुळे गावागावांमध्ये जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच कार्यकर्ते उत्सुक झाले असून भावी नगरसेवक होण्यासाठी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचा किल्ला अभेद्य असल्याचे दावे जोरदार सुरू असले तरी वास्तव्यात बैठका मात्र वांझोट्या ठरत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव आणि ठाकरे सेनेचे खासदार नागेश आष्टीकर हे सातत्याने बैठकांपासून गायब होत आहेत. त्यामुळे “ऐक्याचे फोटो काढा, पण निर्णय नको’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल बाजले असून आजपासून (दि.10) उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत, मात्र आघाडीची अवस्था ‘एकाच घरात तीन मालक अशी झाली आहे. कार्यकत्यांना आश्वासनांच्या गोड गोळ्या देत नेतेमंडळी मात्र स्वतःच्या गोटात खेळताना दिसत आहेत.
माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी वसमत नगरपरिषदेवर आमचे वर्चस्व राहू द्या. असा सूर काढला. त्याला बैठकीत मान्यता मिळाली, पण हिंगोली आणि कळमनुरीच्या जागांवर तिढा कायम आहे. कॉंग्रेस जिल्हाक्षक सुरेश सराफ आणि ठाकरे सेनेचे सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे दोघेही हिंगोलीवर दावा ठोकत आहेत. आमदार प्रज्ञा सातव यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चाच खोळंबली आहे. दुसरीकडे खासदार आहरीकर हे नेहमीप्रमाणे कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर मात्र ‘भावी नगरसेवक आणि ‘भावी नगराध्यक्ष’ यांच्या पोस्टची रेलचेल सुरू आहे. परंतु महाविकास आघाडीतून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. नुसताच शब्द, काम काही नाही. कळमनुरीवर प्रज्ञा सातव यांचा ठाम आग्रह असून तिथे काँग्रेसचा नगराध्यक्ष हवा, अशी त्यांची इच्छा आहे. तर जिल्हाध्यक्ष सराफ हिंगोलीसाठी स्वतःच्या मुलीचा विचार करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन जागा काँग्रेसकडे राहतील की नाही यावर संभ्रम आहे. अखेर कोण ‘बळीचा बकरा’ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीतही गरमागरमीचा उच्चांक
शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कोणतीही बैठक न घेता आपल्या वहिनीची उमेदवारी जाहीर करून युतीचा खेळ मोडीत काढला. तर दुसरीकडे त्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून डोअर-टू-डोअर भेटी, कार्यकत्यांची तळमळ, गाठीभेटी यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखील जोरदार मोर्चेबांधणी केली असून माजी नगराध्यक्ष बांगर यांच्या पत्नी नीता बांगर यांच्यासाठी प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. दरम्यान, राज्य पातळीवर युतीचे एकत्रित लढण्याचे फॉर्म्युला ठरवला जात असून, शीर्ष नेतृत्वाकडून दबाव आणला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.






