पुणे : पुणेकरांची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील पाणीपुरवठा येत्या शुक्रवारी (दि. 24 मे) रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. पाणी पुरवठा विभागाने याचे कारण देखील कळवले आहे.
विद्युतविषयक कामांसाठी पुण्यातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी अधिकची माहिती दिली आहे. पाणी व्यवस्थापनाच्या देखभालीची आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. तसेच विद्युतविषयक कामे देखील केली जाणार आहेत. यामुळे येत्या शुक्रवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच शनिवारी सकाळी उशीराने व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
कोणकोणत्या भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद?
पर्वती एमएलआर टाकी, सर्व पेठा, पर्वती एचएलआर टाकी, पद्मावती, बिबवेवाडी, सॅलिसबरी पार्क, पर्वती एलएलआर टाकी, सिंहगड रस्ता आणि अंतर्गत समाविष्ट गावे, एसएनडीटी टाकी परिसरातील गोखलेनगर, शिवाजीनगर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, बावधन, पाषाण, संपूर्ण कोथरूड, गांधीभवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसार टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी परिसर, चतुःशृंगी टाकी परिसर, पाषाण पंपिंग व सूस गोल टाकी परिसर, लष्कर ते खराडी पंपिंग, लष्कर केंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, जागतिक पाणीपुरवठा योजना चिखली या भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.