ठाणे – रविवारी (२ एप्रिल ) रोजी महाविकास आघाडीची (MVA) वज्रमूठ विराट सभा संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला अलोट जनसागर लोटला होता. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार भाषणे केली. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी तुफान भाषण करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पण सभेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोचरी टिका केली आहे. “मविआची छत्रपती संभाजीनगर येथील सभा म्हणजे वज्रमुठ नसुन सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा आहे”. अशी खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडवली आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी मविआ सभेचा जोरदार समाचार घेतला.
९ एप्रिल रोजी अयोध्या दौरा…
दरम्यान, यावेळी येत्या ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार – खासदारांसह अयोध्या दौर्यावर जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाण्यातील आनंद आश्रम येथे रविवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेला अभिनेते शरद पोंक्षे,राज्य समन्वयक नरेश म्हस्के,माजी आ. रविंद्र फाटक उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, याआधी अयोध्या दौर्यात काही आमदारांना विमानातून उतरावं लागल्याने रामाचे दर्शन झाले नव्हते. तेव्हा, येत्या ९ एप्रिलला सर्व आमदार-खासदारांसमवेत अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले. अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा, आस्थेचा विषय आहे, अयोध्येत भव्य राम मंदीर उभारले पाहिजे. हे स्वप्न बाळासाहेबांचे होते ते पंतप्रधानांनी पूर्ण केले आहे. तेव्हा, खारीचा वाटा म्हणुन जशी धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी चांदीची वीट पाठवली तशीच आम्ही देखील आता महाराष्ट्रातुन सागाची लाकडे अयोध्येला पाठवल्याचे मुख्यमंत्रानी सांगितले.
…तर बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या
मविआच्या वज्रमुठ सभेबद्दल छेडले असता मुख्यमत्र्यांनी, संभाजीनगरमधील सभा पाहून बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या. ही खोटी लोकं आहेत, सत्तेसाठी हपापलेली मंडळी आहेत. ज्या संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करीत होते, त्याच संभाजीनगरमध्ये ही सभा झाली आहे. हे दुर्दैवी असून मविआची ही वज्रझुठ सभा असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष पुढे नेत असताना काही घटना अशा घडल्या, त्या आम्ही आणि सर्वांनी अनुभवल्या आहेत. शिवधनुष्य पेलण्याकरता तेवढे मोठे मन आणि विचार लागतात, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम त्यावेळी बाळासाहेबांनी केले. पण आता हे सर्व कालबाह्य झाले.आता फक्त स्वतःपुरता विचार करून मी आणि माझा परीवार अशा विचाराने लोकं काम करत आहेत. अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली.