कल्याण – अमजद खान : बोगस कागदपत्राच्या आधारे इमारतीच्या परवानगी दिल्या प्रकरणी केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बाळू बहिराम आणि राजेश अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात आणखीन काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणानंतर कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर सडेतोड टिका केली आहे. केडीएमसी भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे अशी टिका केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी परिसरात एका बिल्डरने एक इमारत तयार केली होती. या इमारतीसाठी लागणाऱ्या परवानगी करीता बनावट नकाशा तयार केला होता. या प्रकरणाची तक्रार स्वत: केडीएमसीकडून करण्यात आली होती. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणाच्या चौकशीकरीता संबंधित दोन अधिकाऱ्यांना बोलाविले होते. मात्र ते हजर झाले नाही. अखेर या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वेअर आणि ड्राफ्टमन यांना अटक झाली आहे. नगररचनाकार, सहाय्यक नगररचनाकार हे देखील अडकण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी व्यक्त केली आहे. या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. अशा प्रकारची सात ते आठ प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कल्याणचे आमदार भोईर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण डोंबिवली हे भ्रष्टाचाराचे कुरणच बनत आहे. प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधीचा वचक नाही. बाहेरुन आलेले अधिकारी हे महापालिकेस भ्रष्टाचाराचे कुरण समजतात. महापालिका आयुक्तांनी यावर आळा घातला पाहिजे. केडीएमसीची किती बदनामी आपण सहन करणार असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाच्या तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक करीत आहेत.