फोटो - सोशल मीडिया
अहमदनगर : राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे. आरक्षणावरुन राज्याचे वातावरण तापले असून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी जरांगे पाटील यांची आहे. आज मात्र त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. त्यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील हे कधीच निवडणूक लढणार नाहीत असा दावा देखील हाके यांनी केला आहे.
जरांगे निवडणूक लढवणार नाहीत
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण केले होते. त्यानंतर त्यांनी राज्यभरामध्ये दौरा व सभा देखील घेतल्या. सध्या हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा सुरु असून यामधून त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले, जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकी बाळांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरावी, जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आई बहिणीवर शिव्या घालाव्यात, ही काही निवडणूक लढवण्याची साधन आहेत का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. तसेच मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत, हे मी पेपरवर लिहून देतो. त्यांची लढाई ही आरक्षणाची नसून फक्त वर्चस्वाची आहे, अशी घणाघाती टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
जरांगे पाटील फक्त तारीख पे तारीख देणार
पुढे त्यांनी ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा जरांगे पाटील यांचा डाव असल्याचा आरोप केला. हाके म्हणाले, ना धनगर आरक्षणाबाबत कुठलीही आपुलकी नाही. शरद पवार आणि जरांगे यांची समांतर लाईन आहे, शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, त्याचीच लाईन जरांगे पकडतात. जरांगे पाटील फक्त तारीख पे तारीख देऊ शकतो. याशिवाय जरांगे दुसरे काही करू शकत नाहीत. निवडणुकीमध्ये कोणाविरुद्ध प्रचार करतात हेही सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करेल, निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेल नाही. आणि ते निवडणूक लढवणार देखील नाही, असा गंभीर दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.