सौजन्य - सोशल मिडीया
शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात बिडी पिण्याचे व्यसन असलेला एक ज्येष्ठ नागरिक बिडी पीत असताना अचानकपणे त्यांच्या लुंगीला आग लागली. आग लागल्यामुळे छोटूभाई फकीर मोहम्मद शेख या ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूबाबत नोंद करण्यात आली आहे.
शिरुर येथील डंबेनाला परिसरात राहणारे छोटूभाई शेख यांना बिडी पिण्याचे व्यसन असल्याने ते ४ डिसेंबर रोजी त्यांच्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसून बिडी पेत असताना त्यांच्या लुंगीला अचानकपणे आग लागली, दरम्यान त्यांच्या घरातील व्यक्तींनी पाण्याने आग विझवत त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ५ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय ८५ वर्षे रा. डंबेनाला शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत हमीद छोटूभाई शेख यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिपक राऊत हे करत आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात जावयानेच लावली सासऱ्याच्या घराला आग; कारण वाचून बसेल धक्का
बिडी आरोग्यासाठी हानिकारक
तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण सार्वजनिक ठिकाणी बिडी ओढताना दिसतात. बिडी ही आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगूनही अनेकजण ती ओढताना आढळून येतात. बिडी ओढल्यामुळे लोकांची अवस्था खूप वाईट होते. याची बरीच उदाहरणेही समोर आली आहेत. नागरिकांना बिडीबद्दल असा गैरसमज असतो की, त्यामध्ये तंबाखूचे प्रमाण कमी असते आणि सिगरेटपेक्षा अधिक हानिकारक नसते. आरोग्य तज्ज्ञांनुसार, बिडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पानांचा प्रभाव आणि बिडी ओढताना घेतला जाणारा दीर्घ श्वास आरोग्यासाठी सिगरेटपेक्षा अधिक धोकादायक ठरतो.
बिडीमुळे फुफ्फुसांना त्रास
धूम्रान करणाऱ्या व्यक्तींना बिडी ओढण्यासाठी दीर्घ श्वास घ्यावा लागतो. यामुळे शरिरातील फुफ्फुसांमध्ये गंभीर त्रास निर्माण होऊ शकतो. बिडीमध्ये सिगरेटपेक्षा चारपट कमी तंबाखू असला तरीही बिडी तेवढीच आरोग्यासाठी हानिकारक आहे.
तंबाखू हे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारख्या अनेक जुनाट आजारांचं कारण मानलं जातं. तंबाखूमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतात. भारतात दरवर्षी सुमारे 13.5 लाख मृत्यू तंबाखूशी संबंधित समस्यांमुळे होतात. तंबाखूचं सेवन दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे धूम्रपान आणि दुसरं धूररहित तंबाखू. भारतात तंबाखूच्या सेवनातील सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू. यात जर्दा, खैनी, गुटखा, तंबाखू आणि सुपारी यांचा समावेश होतो.