विरोधी पक्षाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या पासचा खुला बाजार सुरू असल्याचा आरोप
Mumbai Politics : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये थेट विधानसभा लॉबीत झालेल्या वादाचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळ आणि राजकीय संस्कृतीला गंभीर धक्का बसला असून, या प्रकारावर राज्यभरात तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. या सगळ्या राड्यानंतर विधानपरिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार अनिल परब यांनी, ‘विधानभवनात प्रवेशासाठीचे पास चक्क ५ ते १० हजार रुपयांना विकले जात आहेत.’ असा धक्कादायक आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “सभागृहाच्या प्रांगणात काल थेट मारामारी झाली. दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. मोक्का (MCOCA) लावलेले आरोपी विधिमंडळात येतात, हे अतिशय गंभीर आहेत. या सभागृहाला संसदीय परंपरा आहे. विधानसभेच्या परिसरातच असे प्रकार घडणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.” या प्रकारामुळे विधिमंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि प्रवेश प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे.
या प्रकारावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “एक आमदार आपल्या कार्यकर्त्याला मारण्यास सांगतो. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय दिला जातो. इतकंच नव्हे, तर पोलीस आरोपीला तंबाखू मळून देतात – हे अतिशय गंभीर आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नच विधिमंडळात निर्माण झाला आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
याच वेळी आमदार शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांनी विधिमंडळात येण्यासाठी लागणाऱ्या पासबाबत धक्कादायक खुलासा केला. “विधानभवन प्रवेशासाठीचे पास ५ ते १० हजार रुपयांना विकले जात आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला. या सर्व प्रकारामुळे विधिमंडळाच्या शिस्तीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सत्ताधाऱ्यांकडून या आरोपांवर स्पष्ट उत्तर अपेक्षित आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या परिसरात वाढती गर्दी, सुरक्षेचा अभाव आणि प्रवेशाच्या नियमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानभवनात प्रवेशासाठीचे पास ५ ते १० हजार रुपयांना विकले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, “पासचा रेट ५ ते १० हजारांपर्यंत गेलाय. यामुळे सदनात धोका निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाली आहे. मग अशा वेळी इथे चर्चा कसल्या करायच्या?” असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला.
बांगलादेशमध्ये घुसला पाकिस्तानचा शत्रू TTP, आता भारताची चिंता वाढणार; ढाका होणार नवा आतंकी अड्डा?
“या सभागृहाच्या बाहेर राज्याची काय प्रतिमा जात असेल? हे दृश्य अतिशय वेदनादायक आहे. कार्यकर्ते आता थेट सभागृहातच प्रवेश करतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” विधानभवन परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे महिला सदस्यही त्रस्त झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला सदस्य सना मलिक यांनीही नाराजी व्यक्त करत सांगितले, “एवढ्या गर्दीतून वाट काढणे अवघड होत आहे.” या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विधिमंडळाच्या सुरक्षेबाबत आणि पास वाटप प्रक्रियेवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
तर ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनीदेखील विधानभवनातील पास पाच ते दहा हजार रुपयांना विकले जात असल्याचा आरोप केला आहे. “मुंबईतील आयनॉक्स थिएटरजवळ ५ हजार आणि १० हजार रुपये देऊन हे पास विकले जात आहेत. कुणाला किती पैसे द्यायचे, पहिल्या गेटवर किती, आतल्या गेटवर किती — हे सगळं ठरलेलं आहे,” असा खळबळजनक खुलासा परब यांनी केला.
परब म्हणाले, “दुपारपर्यंत एफिडेव्हिटवर नावे लिहून देतो, असे सांगितले जात आहे. म्हणजेच ही एक संगठित व्यवस्था बनली आहे,” असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. या प्रकारामुळे विधानभवनाच्या सुरक्षेवर तसेच प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.