पुणे : विवाह झालेला असताना देखील त्याची माहिती लपवून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी दोन वेळा गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून विशाल लक्ष्मण भोले (वय ३०, रा. ताडीवाला रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१७ ते २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. दोघांची ओळख झाल्यानंतर विशाल याने या तरुणीला लग्न झालेले असताना आपले लग्न झाले नाही, अशी माहिती दिली. तसेच, तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तरूणी दोन वेळा गर्भवती राहिली.
पण, त्याने तरुणीचा जबरदस्तीने दोन वेळा गर्भपात केला. तरुणीने लग्नाबाबत विचारले असता तिला हाताने मारहाणही केली. तरुणीने विशालपासून वेगळे राहण्याचा ठरविले असता त्याने पुन्हा संबंध ठेवण्यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.