अवकाळी पावसाने शेतीचे व फळ बागांचे मोठे नुकसान, आपत्तीग्रस्त लोकं मदतीच्या प्रतिक्षेत
मोखाडा / दीपक गायकवाड: पालघर जिल्ह्यात बुधवार दि. 7 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांचे अतोनात नुकसान केले आहे. तसेच, वादळी पावसामुळे किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांचे तसेच जिल्ह्यातील इतर भागांतील घरांचे व शेतीचे व फळ बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. एकूणच वास्तविक परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी खासदार डॉ हेमंत सवरा यांनी आज जिल्ह्यात ठिक ठिकाणी भेट दिली आहे. यावेळी विशेष बाब तातडीने मदत मिळवून देण्याची ग्वाही सवरा यांनी आपत्तीग्रस्तांना दिली आहे.
पालघर जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार बांधवांवर मोठे संकट ओढावले आहे. बोटी, जाळी, मासेमारीसाठीची यंत्रसामग्री यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांच्या घरांची छतं उडून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.
खासदारांनी मच्छीमार बांधवांशी ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि नुकसानग्रस्त बोटी तसेच साधनसामग्रीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“मच्छीमार समाज हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत कष्टकरी आहे. अशा आपत्तीच्या वेळी शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या शासकीय नियमानुसार नादुरुस्त बोटींना आणि अन्य नुकसानग्रस्तांना दिली जाणारी मदत अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री आणि मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्याकडे तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी ज्या पद्धतीने विशेष आर्थिक मदत जाहीर करण्यात आले होते, त्याच धर्तीवर याही वेळी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. मदतीचा मार्ग जलदगतीने खुला व्हावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सवरा यांनी सांगितले आहे.”
तसेच, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये घरांचे व शेतीचे झालेले नुकसानही गंभीर आहे. या ठिकाणीही तातडीने पंचनामे करून शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यात मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी, पक्षीय पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान आजही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाचे प्रमाण जोरदार असले तरी वादळाने विश्रांती घेतल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तथापि, वीजेचा लपंडाव मात्र सुरुच होता.डहाणू गंजाड भागांतून विद्यूत पुरवठा होत असल्याने दरम्यान कुठेही तांत्रिक बिघाड झाल्यास थेट मोखाडा तालुक्यातील शेवटच्या टोका पर्यंत विद्यूत पुरवठा दीर्घकाळ खंडित होत असतो. ही बाब दरवर्षी पावसाळ्यात सुरुवातीला व अखेरीस उद्भवत असते .त्यामुळे जामसर येथील केंद्राचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी पुन्हा चर्चेत आली आहे.