भाजपच्या मंडळ अध्यक्षाने बांगलादेशींचे घेतले वकील पत्र; शिवसेना ठाकरे गटाचा आरोप
Pahalgam Terror Attack Update : काश्मीरमधील पहेलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर देशात जनमानसात पाकिस्तान आणि बांगलादेशींच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाम हल्ल्याच्या आधी बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार झाल्याचा मुद्दा भाजपने हाती घेतला होता. पोलिसांनी पकडलेल्या बांगलादेशी महिला नागरीकांचे वकिलपत्र भाजपच्या मंडळ अध्यक्षाने घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नारायण पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर भाजपची दुटप्पी भूमिका यातून उघड झाली असल्याचा आरोप ही पाटील यांनी केला आहे. मात्र या प्रकरणात वकिल सत्येंद्र दुबे यांचे म्हणणे आहे की, सुट्टीचे कोर्ट असल्याने माझ्या सहाय्यकाकडून वकील पत्र घेण्यात आले होते. जसे मला माहिती पडले तसे मी वकीलपत्र मागे घेतले आहे. ते सर्व रेकॉर्डवर आहे, असं सांगण्यात आले.
बांगलादेशात शेख हसीना यांचा तख्ता पलटल्यानंतर बांगलादेशात हिंदूवर अत्याचार झाले. या अत्याचाराच्या विरोधात भारतात त्याचे पडसाद पाहावयास मिळाले. देशभरात बांगलादेश विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजपने जागोजागी आंदोलन केले. मात्र आत्ता शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्याने लावलेल्या एका आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे .शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नारायण पाटील यांचा आरोप आहे की, देशभरात युद्धजन्य परिस्थिती सुरु आहे. कारण हिंदू मुस्लीमांचे धार्मीक रंग देऊन भाजप राजकारण करते. बांगलादेशातील हिंदूवर झालेला अन्याय असेल आत्ता पहेलगाममध्ये झालेला अतिरेकी हल्ला असेल. अशा प्रकारची भूमिका घेऊन भाजपने राजकारण केले आहे. ही भूमीका दुहेरी आहे.
कल्याण पूर्वेतील सत्येंद्र दुबे हा भाजप युवा मोर्चाचा मंडळ अध्यक्ष आहे. पोलिस बांगलादेशींना पकडून आणतात. त्यांचे वकील पत्र दुबे घेतो. बांगलादेशींना साेडविण्याचे काम हा भारतीय युवा मोर्चाचा अध्यक्ष करीत आहे. ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. भाजप हे देशभक्ती बाता करते. त्यांचे कार्यकर्ते काय करतात. सत्येंद्र दुबे हे भाजपाचे नाही तर संघाचे कार्यकर्ते आहेत. याबाबत भाजपने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा दुबे हे नेत्यांच्या सांगण्यावरुन हे करीत असल्याचा अर्थ होईल. काही दिवसापूर्वी मानपाडा पोलिासांनी चार बांगलादेशी महिलांना पकडले होते. ज्या बार गर्ल होत्या. त्या प्रकरणात दुबे यांनी वकिलपत्र घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात दुबे यांचे म्हणणे आहे की, त्या दिवशी सुट्टीचे कोर्ट असल्याने न्यायालयाने माझ्या सहाय्यकाला वकील पत्र घेण्यास सांगितले होते. त्यानंतर मला माहिती पडल्यावर या प्रकरणातून मी माघार घेतली आहे. त्याची कॉपी कोर्टाच्या रेकार्डवर आहे. या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असं दुबे यांनी सांगितले.
सिंदूर ऑपरेशनने पाकच्या आणले नाकीनऊ; भारताने उद्धवस्त केलेली Air Defence Radar System म्हणजे काय?