फलटण दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
Phaltan News: राज्य शासनाच्या ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ या धोरणाच्या अंमलबजावणीवर सातारा जिल्ह्यात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फलटण येथील दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालयात अनियमितता आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी चौकशीची मागणी केली आहे.
संदीप पवार यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आठवड्यातील काही दिवस ५० हून अधिक दस्त नोंदणी होत असल्याचे आढळून येत आहे. हा आकडा संशयास्पद असून, दस्तांची आवश्यक तपासणी न करता सर्रास नोंदणी केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण
तसेच ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ या धोरणाचा गैरवापर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. इतर तालुक्यांतील व्यवहार जाणीवपूर्वक फलटण येथे वळवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः पाटण, महाबळेश्वर आणि मेढा या तालुक्यांतील निबंधक कार्यालयांमध्ये नोंदणीचे प्रमाण कमी असतानाही संबंधित प्रकरणे फलटण येथे नेली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांना अनावश्यक प्रवास, आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली सेवा वापरण्याऐवजी नागरिकांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागत असल्याने गैरसोय वाढली आहे.
आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर
या सर्व पार्श्वभूमीवर फलटण येथील दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालयाच्या कामकाजाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, तसेच सर्व दस्त नोंदणी प्रक्रियेचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी संदीप पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने या गंभीर आरोपांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






