पावसाळा आणि मुंबईतील खड्डे यांचे जुने नाते आहे. १० दिवस जर मुंबईमध्ये पाऊस कोसळला तर लगेच रस्त्यांवर खड्डे पडून नागरिकांचे हाल होत असतात. त्यामुळे वाहन चालकांना आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.
मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य मार्गांवर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर खड्यांचा त्रास होऊ नये म्हणून एमएमआरडीएने जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र पावसाच्या हजेरीनंतर हा रस्ता खराब झाल्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले जात आहेत. मिरा-भाईंदर शहरात सध्या मेट्रो निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर गोल्डन नेस्ट ते काशीमिरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले होते.
त्यामुळे या मार्गावर सिमेंट रस्त्याची उभारणी करण्याची मागणी वारंवार प्रवासीवर्गाकडून करण्यात येत होती. मात्र मेट्रोचे काम सुरू असल्याने केवळ मार्गाला डांबरीकरण करण्याची परवानगी राज्य शासनाच्या एमएमआरडीएने दिली आणि यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च मंजुर करून काम पूर्ण देखील केले होते. डांबरीकरणाचे हे काम आधुनिक पद्धतीने झाल्याने येत्या १० वर्षात देखील या रस्त्यावर खड्ड्याचा त्रास होणार नसल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. मात्र कामाच्या अवघ्या तीन महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडल्याचे दिसून आले.
या खड्ड्यामुळे आतापर्यंत दोन बाईकस्वारांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरीक संप्तत झाले आहेत. याचाच विरोध म्हणून आज युवक काँग्रेस तर्फे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गोल्डन नेस्ट या ठिकाणी प्रंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा समुद्राखालील फोटो कटाऊट खड्डयात लावून निषेध करण्यात आला तसेच यावेळी घोषणा ही देण्यात आल्या सदर आंदोलन माजी आमदार मुझफ्फर हुसैन, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे ह्यांच्या नेतृत्वात करण्यात आले या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.