पिंपरी : शिरगाव पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक दिलीप बोरकर (वय ३६, मूळ रा. नांदेड) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही घटना रविवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
दिलीप बोरकर यांना रविवारी सकाळपासून अस्वस्थ वाटत होते. त्यातूनही ते कर्तव्यावर हजर होते. दुपारी त्यांनी सहकाऱ्यांसोबत जेवण केले. त्यानंतर त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते चौकीतच थोडा वेळ झोपले. काही वेळेनंतर सहकारी पोलीस बोरकर यांना झोपेतून उठवण्यासाठी गेले असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यमुळे शिरगाव चौकीतील सहकारी पोलिसांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दिलीप बोरकर हे सन २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. शिरगाव चौकीची स्थावना झाल्यापासून ते या चौकीत नेमणुकीस होते. अतिशय मितभाषी आणि मनमिळावू अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. बोरकर यांच्या अकाली निधनाने पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.