सातारा : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पुणे-बंगळूर महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान, सातारा हद्दीतील महामार्गावर जास्त प्रमाणात खड्डे असून, यामधून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. शनिवारी या महामार्गावर चाहूर येथे एकाच रात्रीत तब्बल 15 हून अधिक गाड्यांचे टायर फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे वाहनचालकांतून संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
महामार्ग देखभाल विभागाच्या पोलिसांच्या वतीने तात्पुरत्या स्वरुपात बॅरिकेटस लावले. या खड्डयात झाडे लावण्याचा इशारा ठाकरे गटाने दिल्यानंतर रविवारी सकाळी या खड्डयात महामार्ग देखभाल विभागाने मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. याबाबची अधिक माहिती अशी, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरालगत चाहूर हा परिसर आहे. या परिसरातील महामार्गावर तीन फूट लांब आणि अर्धा फूट खोल असे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
दरम्यान, शनिवारी रात्री या महामार्गावरुन काही गाड्या निघाल्या असताना त्यांचे टायर पंक्चर झाले तर काहींचे टायर फुटले. यामध्ये काही प्रवासी जखमी झाले होते. सुदैवाने यावेळी कोणतीही मोठी अपघाताची घटना घडली नाही. या ठिकाणी महामार्गाची खड्डयामुळे झालेली दुरावस्था पाहिल्यानंतर वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.