सौजन्य - नवराष्ट्र टीम
सोलापूर/ शेखर गोतसुर्वे : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. खासदार प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. अटीतटीच्या लढतीत प्रणिती शिंदे यांनी विधान सभेत हॅट्रीक करित विजयाची मोहर उमटवली होती. शहर मध्य मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा या बालेकिल्ल्या समोर तगडे आव्हान उभे करण्यात आले आहे. भाजपचे देवेंद्र कोठे, माकपचे नरसय्या आडम, एमआयएमचे फारूख शाब्दी, बंडखोर अपक्ष उमेदवार तौफीक शेख या सर्वांची लढत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या विरोधात होणार आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी प्राणिती शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शहरमध्य मतदार संघात गोरगरीब कष्टकरी वर्ग मोठया प्रमाणात आहे. २०१४ सालापासून जातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. काँग्रेस विरुद्ध एमआयएम आशी कडवी झुंज पाहायला मिळाली होती. एमआयएमसाठी सरळ लढत असताना शरद पवार गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार तोफीक शेख यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. २०१४ साली तोफीक शेख यांनी एमआयएम पक्षाकडून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या लढतीत तौफीक शेख यांचा पराभव झाला होता. दुसऱ्या क्रमांची मते त्यांना मिळाली होती. २०१९ साली एमआयएमकडून फारुख शाब्दी यांनी निवडणूक लढवली होती. या ही लढतीत प्रणिती शिंदे विजयी झाल्या होत्या. मात्र एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आबाधित ठेवले होते.
नरसय्या आडम यांचा ‘एकला चलो’चा नारा
यंदाच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार एन्ट्री करीत देवेंद्र कोठे यांना निवडणूकीच्या रणांगणात उभे केले आहे. आक्रमक भाषणामुळे देवेंद्र कोठे अल्पवधीत लोकप्रिय ठरले आहेत. काँग्रेस, भाजप, एमआयएमशी तिरंगी लढत होत असताना माकपचे नरसय्या आडम यांनी लालबावटयाचा ललकार दिला आहे. महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र काँग्रेसने त्यांचा उमेदवार दिल्याने आडम नाराज होऊन ‘एकला चलो रे ‘चा नारा दिला आहे.
महिला मतदारांची संख्या सर्वाधिक
शहर मध्य या मतदारसंघातील मतदारांची संख्या एकूण तीन लाख ४६ हजार ६७७ इतकी आहे. २०१९च्या निवडणुकीत या मतदारसंघात ५५.७१ टक्के मतदान झाले होते. २०१४ व २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात एक लाख ७० हजारांपर्यंत मतदान झाले आहे. या निवडणुकीत साडेतीन लाखांपैकी किती मतदान होणार, यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यावर उमेदवारांचा भर राहील हे निश्चित आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात आघाडीत बिघाडी; शहरातील ‘या’ मतदारसंघात बंडखाेर उमेदवारांची माघार नाही
वेळ संपल्याने अर्ज माघारी घेता आला नाही
शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी माघारी घ्यावी, अशी माझ्या समाजाची मागणी होती. समाजाने समजावल्यानंतर त्यांचा मान राखावा म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज माघार घेणार होतो. त्यासाठी मी आलो. मात्र येण्याअगोदरच वेळ संपली होती. त्यामुळे माझा उमेदवारी अर्ज तसाच राहिला. तेव्हा आता मी निवडणूक लढवणार आहे. तसेच दक्षिण सोलापूर मतदार संघापेक्षा शहर मध्य मतदारसंघावर जास्त लक्ष देणार आहे.
– तौफिक शेख, अपक्ष उमेदवार शहर मध्य मतदारसंघ
२०१९ च्या निवडणुकीचा निकाल
प्रणिती शिंदे : काँग्रेस (48,832)
फारूक शाब्दी : एमआयएम (36,889)
महेश कोठे : अपक्ष (29,526)
दिलीप माने : शिवसेना (27,340)
नरसय्या आडम : माकप (10,128)
राहूल सर्वगोड : बसप (685)
विजय आबुटे : बहुजन विकास आघाडी (375)
इम्तियाज पीरजादे : वंचित बहूजन आघाडी (2531)
खतीब वकील : आप (212)
गौस कुरेशी : हिंदुस्थान जनता पार्टी (392)