सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी भरलेले अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच प्रचाराला प्रारंभ केला आहे. आता मात्र पठारे मतदारसंघात फिरुन प्रचार करत आहेत. ताई आहे का घरातं, तुतारी आलीया दारातं, अशा प्रकारची गाणी गात घरोघरी पठारेंचा प्रचार सुरू आहे.
दिवाळीच्या काळात थंडावलेल्या प्रचाराने आता पुन्हा एकदा वेग घेतला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात सुरुवातीपासूनच बापूसाहेब पठारे यांचा प्रजोरदार प्रचार सुरु आहे. मतदारसंघातील घरोघरी भेट देत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. मंगळवारी सकाळी तर वडगाव शेरी परिसरात प्रचाराची दिंडी पाहायला मिळाली. अनेक लहान थोर आणि चिमुरडे वारकऱ्यांच्या वेशात या दिंडीत सहभागी झाली होते. टाळ मृदुंग आणि तुतारीच्या गजरात बापूसाहेब पठारे यांचा प्रचार सुरू होता. तर काही नागरिकांनी ताई आहे का घरात तुतारी आली या दारात अशा प्रकारची गाणी गाऊन मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे आणि अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्यात लढत होणार आहे. पठारे यांनी आधीपासूनच घरोघरी भेट देत प्रचाराला सुरुवात केली होती. तर सुनील टिंगरे यांची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाली. तत्पूर्वी महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार यावर चर्चा झाली. आणि अखेर सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उमेदवारी मिळाल्यानंतर सुनील टिंगरे हे देखील प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे वडगाव शेरीत या दोन्ही उमेदवारांच्या रूपाने काटे की टक्कर पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.
राज्यात प्रचाराचा धुराळा
दिवाळी संपल्यानंतर लगेचच आता निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला आहे. बहुतांश उमेदवारांनी आपली प्रचार कार्यालये सुरु केली असून घरोघरी प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता रंगात आला आहे. दिवाळीपूर्वी उमेदवारी अर्ज भरून झाल्यामुळे आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आपल्यासमोर कोणाचे आव्हान आहे हे उमेदवारांना स्पष्ट झाले असून आता खऱ्या अर्थाने निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर गेले चार-पाच दिवस दिवाळीचा सण असल्यामुळे घरोघरी प्रचाराला सुरुवात झाली नव्हती. दिवाळीच्या दिवसांमध्ये वसाहतीमधल्या पूजा, समारंभाना उमेदवारांनी उपस्थिती लावली आणि प्रचाराचा सुरुवात केली. मात्र आता दिवाळी संपल्यानंतर सोमवारपासून घरोघरी प्रचाराला वेग आला आहे. तर बहुतांश उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी समाजमाध्यमांवरही समूह गट सुरु केले आहेत.