पंढरपूर : मागील दहा वर्षात नागरिकांनी खासदार हे नाव ऐकले होते. परंतु खासदाराची जवळून अनुभूती घेतली नव्हती. याचाच फायदा नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना झाला आहे. नागरिकांनी त्यांच्या ओळीत भरभरून मते टाकली आहेत. परिणामी खासदार प्रणिती शिंदे या लागलीच नागरिकांच्या सेवेस लागल्या आहेत. नागरिकांच्या कामासाठी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामे करायची नसतील तर-जिल्हा सोडून निघून जावा, असा निर्वाणीचा इशारा दिला.
प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी, कासेगाव आणि गादेगावचा दौरा केला. या दौन्यात त्यांनी नागरिकांमध्ये मिसळून मोठा आनंद घेतला. मागील दहा वर्षाच्या काळात, या मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आले होते. या दोन्ही खासदारांनी कधीही नागरिकांची भेट घेतली नव्हती. किंबहुना या मतदारसंघातील नागरिकांना खासदार हा दुर्मिळच होता. यामुळे नागरिकांमध्ये भाजपच्या खासदारांविषयी नाराजी होती. हीच नाराजी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करणारी ठरली या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी मला निवडून द्या, नागरिकांची आणि शेतकऱ्यांची कामे अडू देणार नाही, अशी विनंती नागरिकांना केली होती. मागील खासदारांविषयीची नाराजी आणि प्रणिती शिंदे यांनी केलेले आवाहन यामुळे नागरिकांनी त्यांना भरभरून मते दिली होती. याचीच परतफेड म्हणून शिंदे यांनी नॉन स्टॉप गावभेट दौरे सुरू केले आहेत.
या गावभेट दौऱ्याप्रसंगी अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांच्यासोबत होते. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नावर प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांची आणि नागरिकांची कामे करा, अथवा जिल्हा सोडून दूर जावा, असा इशाराच यावेळी त्यांनी दिला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयीची भूमिका सौम्य होती. परंतु मी तसे करणार नाही, शेतकरी आणि नागरिकांची कामे न झाल्यास, हक्कभंगही आणू शकते, असा सज्जड दम प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला.