फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : राज्यामध्ये सध्या राजकोट प्रकरणावरुन वातावरण गरम आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी तीव्र रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे.
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते त्यांचा ड्रीम प्रोजक्ट मानल्या जाणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाबद्दल भरसभेमध्ये माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. मोदी म्हणाले की, “सिंधूदुर्गामध्ये जे झालं ते वाईट झालं. माझ्यासाठी आणि माझ्या साथीदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. सिंधूदुर्गातील प्रकरणामुळे मी आज नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची चरणावर डोके ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही अशी लोकं नाहीत जी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अर्वाच्च भाषेत बोलणारे आम्ही नाहीत. देशभक्तांच्या भावना पायदळी तुडवणारे आणि अपमान करणारे आम्ही नाहीत,”अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. तसेच अप्रत्यक्षपणे कॉंग्रेस पक्षाला खडेबोल सुनावले आहेत.
शिवप्रेमींची मनं दुखावल्याबद्दल माफी मागतो…
मुंबईमध्ये कॉंग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन झेडले आहे. पंतप्रधानांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करत राजकोटमध्ये पुतळा कोसळल्यामुळे माफी मागण्याची मागणी केली. त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “याच भूमीचे सुपुत्र असलेल्या वीर सावरकर यांचा काही जण अपमान करतात. मात्र तो केल्यानंतर माफी मागण्यसाठी सुद्धा तयार नाहीत. न्यायालयामध्ये जाऊन लढाई लढण्यासाठी तयार आहेत. एवढ्या महान देशभक्तांचा अपमान करुनही ज्यांना पश्चत्ताप होत नाही. त्यांचे संस्कार महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहेत. मी आज या पुण्यभूमीमध्ये आल्यानंतर पहिलं काम आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची माफी मागण्याचं करतो आहे. या घटनेमुळे जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतात, त्या प्रत्येकाच्या मनाला ज्या वेदना झाल्या आहेत. त्या सर्व शिवप्रेमींची देखील नतमस्तक होऊन माफी मागतो. आमच्यासाठी आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं काहीच नाही,” अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.