Pune Municipal Corporation
पुणे : महापालिकेला संपलेल्या आर्थिक वर्षात मिळकत करातून सुमारे २ हजार २७३ कोटी रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे यातील निम्म्याहून अधिक रक्कम ही पुणेकरांनी ‘ऑनलाईन पेमेंट’ केली आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २०४ या कालावधीत महापालिकेला मिळकत करापोटी २ हजार २७३ कोटी २७ लाख १० हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. सुमारे ११ लाख ९३ हजार २९४ मिळकतदारांनी यंदा कर भरला आहे. शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मिळकत कर जमा झाला आहे. एकूण मिळकतदारांपैकी ६ लाख ६० हजार ५४७ मिळकतदारांनी ऑनलाईन पेमेंट करणे पसंत केले आहे.
ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून महापालिकेकडे १ हजार १७९ कोटी ६ लाख , ९६ हजार रुपये इतका मिळकत कर जमा झाला आहे. १ लाख ३६ हजार ३५१ जणांनी धनादेशाद्वारे ८०८ कोटी ५१ लाख, ६५ हजार रुपये इतका कर जमा केला. तर ३ लाख ९६ हजार ३९६ मिळकतदारांनी रोख स्वरुपात २८५ कोटी ६८ लाख ४८ हजार ९७४ कोटी रुपये इतका मिळकत कर जमा केला आहे.
मागील आर्थिक वर्षात ( २०२२-२३ ) या आर्थिक वर्षात महापालिकेला मिळकत करापोटी १ हजार ८६८ कोटी ४४ लाख १३ हजार ७८३ रुपये जमा झाले होते. या तुलनेत चालू आर्थिक वर्षात ( २०२३-२४ ) ४०४ कोटी रुपयाहून अधिक मिळकत कर जमा झाला आहे. (सन२०२४-२५) महापालिकेने मिळकतकरातून महापालिकेच्या तिजोरीत २ हजार ४०० कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.