पुणे: पुणे मेट्रोची विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाली आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येतील वाढ गुरुवारी कायम राहिली. या मार्गावर गुरुवारी रात्री सातपर्यंत सुमारे २८ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधीच्या तुलनेत मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल सहापट वाढ झाली आहे.
मेट्रोची विस्तारित सेवा १ ऑगस्टला सायंकाळी पाचला सुरू झाली. वनाझ ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग आता सुरू झाला आहे. याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. मेट्रोतून १ ऑगस्टला एकूण १२ हजार ९१८ प्रवाशांनी प्रवास केला. त्याचबरोबर बुधवारी (ता. २) ३० हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रोतून गुरुवारी रात्री सातपर्यंत २८ हजार ६९८ प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.