पुणे : महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर (Illegal Hoarding) जोरदार कारवाई सुरु झाली असून, बुधवारी 29 तर गुरुवारी 15 होर्डिंग उतरविण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाने (Pune Corporation) कळविली आहे. तसेच होर्डिंगच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलीटीचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे महापालिका खडबडून जागी झाली आहे. अनधिकृत होर्डिंगवर जोरदार कारवाई सुरु केली आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंगची संख्या अधिक आहे. त्याभागात कारवाई सुरु करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी 29 होर्डिंग उतरविले गेले. तर गुरुवारी ही कारवाई सुरु होती. दुपारपर्यंत पंधरा होर्डींग उतरविण्याचे काम सुरु होते, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार हे देखील या कारवाईवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष कारवाईच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. कारवाई विषयी खेमणार म्हणाले, ‘अनधिकृत होर्डींग उतरविण्याची कारवाई थांबलेली नाही. ती सातत्याने सुरु आहे. पावसाळा येऊ घातला आहे. या कालावधीत जोरदार वारे वाहून होर्डिग कोसळू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
तसेच अधिकृत होर्डींगच्या मालकांना त्याचे स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी करून घेण्यास सांगितले. पुढील 15 दिवसांत त्यांनी हे काम करणे अपेक्षित आहे. अन्यथा पुढील कारवाई केली जाणार आहे. आम्हाला संशयास्पद वाटणाऱ्या स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी अहवालाची फेर तपासणी आम्ही करून घेणार आहोत.’
एका मंत्र्यामुळे कारवाई थांबली होती?
आकाशचिन्ह परवाना विभागाने सुरु केलेल्या कारवाईमुळे जाहिरात व्यावसायिकांनी एका मंत्र्याची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. संबंधित मंत्र्याने कारवाई थांबविण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते, अशी चर्चा रंगली आहे. परंतु, पिंपरी चिंचवड येथील घटनेनंतर मात्र महापालिकेने जोरदार कारवाई सुरु केली आहे.