पुणे : पिंपरी चिंचवड येथील शाळेमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अयोध्येमध्ये (Ayodhya) लाईव्ह पेंटिंग (Live painting) काढण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. राम मंदिर उद्घाटनावेळी (Ram Mandir Inauguration) स्वामी रामभद्राचार्य यांच्या संस्थेकडून अमृत महोत्सव उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमामध्ये राम मंदिर परिसरामध्ये लाईव्ह पेंटिंग साकारले जाणार आहे. यासाठी देशभरातून 20 कलाकारांची निवड करण्यात आली. यामध्ये पुण्यातील चित्रकार दिलीप माळी (Painter Dilip Mali) यांचा देखील सहभाग असणार आहे.
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. यामध्ये स्वामी रामभद्राचार्य यांच्या रामानंद मिशन विश्वस्त संस्थेने ‘अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. या उपक्रमामध्ये उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी देशातील तब्बल 20 चित्रकार मंदिर परिसरामध्ये लाईव्ह पेंटिंग काढणार आहेत. यासाठी देशभरातील अनेक चित्रकारांची पारख करण्यात आली. यामध्ये पुण्याच्या दिलीप माळी यांची निवड झाली आहे.
अयोध्येमध्ये कला सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल दिलीप माळी यांनी आनंद व्यक्त केला असून याचे श्रेय आई व बायकोला दिले आहे. मागील 20 वर्षांपासून दिलीप माळी यांनी चित्रकलेचा दीर्घ अनुभव आहे. थेरगावच्या प्रेरणा शाळेत ते कला शिक्षक म्हणून कार्यरत देखील आहेत.
मूळचे कऱ्हाड तालुक्यातील ओंड या गावचे असणाऱ्या दिलीप माळी यांनी बेळगाव येथे ए.टी. डी. आणि पुढे अभिनव महाविद्यालयातून जी. डी.आर्ट, ए. एम. असे शिक्षण घेतले आहे. आत्तापर्यंत त्यांची वैश्विक आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, वाची आर्ट गॅलरी, बालगंधर्व कलादालन, नेहरू सेंटर, मुंबई, ललित कला अकॅडमी दिल्ली येथे चित्रांची प्रदर्शने भरवण्यात आली आहेत.