Pune Police Deploys Special Team For Women Safety In Pmpml Buses
Pune Police : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; पुणे पोलिसांनी आखली विशेष मोहीम
पुणे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यासाठी विशेष पोलीस पथक पीएमपी बससेवांमध्ये तैनात करण्यात आले आहे
पीएमपीएमएल बस मधील महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
पुणे : मागील काही महिन्यांमध्ये पुण्यातील महिला अत्याचार आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरण किंवा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण अशी अनेक प्रकरणे पुण्यामध्ये घडली असून यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यासाठी विशेष पोलीस पथक पीएमपी बससेवांमध्ये तैनात करण्यात आले आहे. या पथकात ४ पोलीस अधिकारी आणि २२ कर्मचारी यांचा समावेश आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात दररोज ३८१ मार्गांवर २०,११२ फेऱ्यांद्वारे १० ते ११ लाख प्रवाशांना सेवा पुरवते. दररोज लाखो महिला बसचा वापर करुन प्रवास करतात. नोकरी करणाऱ्या महिला बसप्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, काही सामाजिक कंटकांकडून बस व बीआरटी स्थानकांमध्ये महिलांना त्रास देणे, आय टिजिंग, चोरी तसेच अश्लील मजकूरांचे चित्रण आदी घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलच्या विनंतीवरून पोलीस आयुक्तालयाने विशेष गस्त मोहिम सुरू केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (२), सहाय्यक पोलीस निरीक्षक (१), पोलीस उपनिरीक्षक (१) आणि २२ पोलीस कर्मचारी यांना विविध बसमार्गांवर सक्रीय करण्यात आले आहे. हे अधिकारी व कर्मचारी प्रवासादरम्यान बसमध्येच उपस्थित राहून आवश्यक कारवाई करणार आहेत.
या मोहिमेमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होणार आहे. ही गस्त विशेषतः गर्दीच्या वेळेत – सकाळी आणि संध्याकाळी – मुख्य बसस्थानकांवर व प्रमुख मार्गांवर केली जाणार आहे. पीएमपीएमएल आणि पोलीस विभाग यांच्यातील ही समन्वयात्मक कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकांमध्ये दुर्दैवी घटना घडली होती. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. पहाटेच्या वेळी गावी निघालेल्या 26 वर्षीय तरुणीला फसवून बंद गाडीमध्ये बसवून तिच्यावर अत्याचार केला. फेब्रुवारी महिन्यामध्ये ही घटना घडली होती. घटना होण्याच्या काही काळ आधी तिथून पोलिसांनी गस्त देखील घातली होती. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी घटनेच्या 75 तासांनंतर अटक केली. अगदी सापळा रचून दत्ता गाडेला अटक करण्यात आली होती.
स्वारगेट अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सतत गजबजलेल्या स्वारगेट बस डेपो परिसरात ही घटना घडल्याने पोलिसांवर देखील दबाव होता. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी श्वानपथक, ड्रोन कॅमेरे अशा पद्धतीने यंत्रणा राबवली. आरोपीच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरासह अनेक ठिकाणी पोलिसांची शोध मोहीम सुरु होता. 100 ते 150 पोलिसांची फौज ऊसाच्या शेतात देखील आरोपीचा शोध घेत होती. या प्रकरणानंतर आता महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Web Title: Pune police deploys special team for women safety in pmpml buses